चाराटंचाईवर प्रशासनाचा यु-टर्न
By Admin | Updated: December 6, 2014 02:02 IST2014-12-06T02:02:32+5:302014-12-06T02:02:32+5:30
जिल्ह्यात सध्या एक लाख ३१ हजार मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनानेच जाहिर केल्यानंतर ....

चाराटंचाईवर प्रशासनाचा यु-टर्न
यवतमाळ : जिल्ह्यात सध्या एक लाख ३१ हजार मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनानेच जाहिर केल्यानंतर आता मात्र चाराटंचाई यावर्षी जाणवणार नसल्याचा दावा करीत यु-टर्न घेतला आहे. विशेष असे, काँग्रेस, राष्ट्रवादी व इतरही संघटनांनी जिल्ह्यात चारा डेपो उघडण्यात यावे, अशी मागणी विविध ठिकाणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पशुधनास दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची आवश्यकता भासत असते. यावर्षी खरीपात झालेली पेरणी तसेच वैरण विकास योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादन होणार असल्याने चारा टंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे.
विविध माध्यमातून यावर्षी १७.६२ लाख मे.टन चारा जिल्ह्यात उत्पादित होणार असून त्यापैकी ४.४७ मे.टन चाऱ्याची सद्यस्थितीत उपलब्धता आहे.
जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय मिळून एकून ७ लाख ७८ हजार इतके पशुधन आहे. या पशुधनास दरदिवशी ४१४३ मे.टन या प्रमाणे वषार्ला १५.१३ लाख मे.टन चाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. त्यात यवतमाळ तालुक्यातील पशुधनास १.१९ लाख मेट्रिक टन, बाभूळगाव तालुक्यातील पशुधनास ५७ हजार, कळंब ८४ हजार, राळेगाव ७१ हजार, घाटंजी एक लक्ष, पांढरकवडा ९९ हजार, वणी १.१४ लक्ष, मारेगाव ७१ हजार, झरी ६८ हजार, नेर ८८ हजार, आर्णी १.०७ लक्ष, दारव्हा १.१२ लक्ष, दिग्रस ८० लक्ष, पुसद १.५३ लक्ष, महागाव ५५ लक्ष, उमरखेड १.३६ मेट्रीक टन चाऱ्याचा समावेश आहे.
कृषी विभागाच्या खरीप हंगामातील पिक पेरणीच्या अहवालानुसार सोयाबीन, तीळ, तूर, मूग, उडीद, भात, बाजरी, ज्वारी, कापूस, ऊस इत्यादी खरीप पिकाच्या पेरणीनुसार १०.६७ लाख मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन होणार आहे. तसेच वनक्षेत्र व पडित क्षेत्रावर ४.४७ लाख मेट्रिक टन चारा उत्पादीत होणे अपेक्षित आहे.
पशुसंवर्धन व कृषी विभागाच्यावतीने वैरण विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात वाटप केलेल्या वैरण बियाणांच्या माध्यमातून २.२१ लाख मेट्रिक टन चारा उत्पादन होणार आहे. अशा प्रकार सर्व माध्यमातून जिल्ह्यात १७.६२ लाख मेट्रिक टन चारा उत्पादीत होतील. सद्यस्थितीत वनक्षेत्र व पडित क्षेत्रावरील ४.४७ लाख मेट्रिक टन चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. जिल्ह्यात पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने खरीपासोबतच रब्बी पिकांच्या पेरणीपासून सुध्दा अपेक्षित चाऱ्याचे उत्पादन होणार आहे.
त्यामुळे या वर्षभरात जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी सांगितले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या दाव्यावर विश्वास ठेवल्यास पशुपालकांचा नक्कीच दिलासा मिळणार असल्याचे यातून दिसते. (प्रतिनिधी)