‘सीएस’च्या लाचखोर शिपायाला दोन वर्षे शिक्षा
By Admin | Updated: May 1, 2016 02:26 IST2016-05-01T02:26:05+5:302016-05-01T02:26:05+5:30
वैद्यकीय बिलाच्या मंजुरीसाठी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या शिपायाला शनिवारी येथील न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

‘सीएस’च्या लाचखोर शिपायाला दोन वर्षे शिक्षा
लाचप्रकरण : जिल्हा न्यायालयाचा निकाल
यवतमाळ : वैद्यकीय बिलाच्या मंजुरीसाठी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या शिपायाला शनिवारी येथील न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. २००७ साली ६३ हजार रुपयांच्या बिल मंजुरीसाठी लाचेची मागणी केली होती.
शिवप्रसाद बद्रीप्रसाद मिश्रा (५७) असे शिक्षा झालेल्या शिपायाचे नाव आहे. येथील वीज वितरण कंपनीतील कनिष्ठ लिपीक मनोज देशभ्रतार यांनी येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे वैद्यकीय बिल २००७ मध्ये सादर केले होते. या बिलाच्या मंजुरीसाठी शिवप्रसाद मिश्रा याने १० टक्के लाचेची मागणी केली. देशभ्रतार यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. ८ मार्च २००७ रोजी तीन हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. येथील न्यायालयात या प्रकरणात शासनातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. युक्तिवादाअंती गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी शिवप्रसाद मिश्रा याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी दोन वर्षे कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एन.जी. नथवाणी यांनी काम पाहिले. (शहर वार्ताहर)