ट्रेलर अपघातात दुचाकीस्वार दोघे ठार
By Admin | Updated: February 5, 2015 23:16 IST2015-02-05T23:16:29+5:302015-02-05T23:16:29+5:30
लोखंडी अवजड पत्रांच्या चादरी वाहून नेत असलेल्या ट्रेलरची साखळी तुटली आणि त्याचवेळी तेथून जाणाऱ्या दुचाकीवर पत्रे आदळल्याने त्याखाली चिरडल्या जाऊन दोन जण जागीच ठार झाले.

ट्रेलर अपघातात दुचाकीस्वार दोघे ठार
आर्णी : लोखंडी अवजड पत्रांच्या चादरी वाहून नेत असलेल्या ट्रेलरची साखळी तुटली आणि त्याचवेळी तेथून जाणाऱ्या दुचाकीवर पत्रे आदळल्याने त्याखाली चिरडल्या जाऊन दोन जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, दोघांचेही हातपाय धडापासून वेगळे झाले होते. हा अपघात आर्णी-माहूर मार्गावरील कोसदनी घाटात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडला.
बाळाभाऊ श्रीराम कडू (५५) रा. सायखेडा आणि अनिल बालाजी चौधरी (३२) रा. लिंगी असे ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहे. बाळाभाऊ आपल्या जावयाचा लहान भाऊ अनिल सोबत गुरुवारी महागाव येथे मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून दुचाकी क्र.एम.एच.२९-एएच-६११८ ने गावी परतत होते. दरम्यान कोसदनी घाटात समोरुन लोखंडी पत्रे भरुन असलेला ट्रेलर (सीजी-०४-जेसी-९३२५) येत होता. काही कळायच्या आत या लोखंडी अवजड पत्र्यांना बांधलेली साखळी तुटली आणि एक एक पत्रा घाटातील चढउतारामुळे घसरु लागला. त्याच वेळी बाळाभाऊ दुचाकीने जात होते. अवघड पत्रे या दोघांच्या अंगावर कोसळल्याने दोघांचेही हातपाय कापल्या गेले. अक्षरश: धडापासून वेगळे पडले. अपघात झाल्याची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे विखुरलेले अवयव पाहून प्रत्येकजण हळहळत होता. या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. मृत दोघेही शेतकरी असून अनिलच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा तर बाळाभाऊच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. आर्णी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. (शहर प्रतिनिधी)