दोन जुळ्या गावांची होते फरफट
By Admin | Updated: September 3, 2015 02:09 IST2015-09-03T02:09:40+5:302015-09-03T02:09:40+5:30
येथून १२ किलोमीटर अंतरावरील आणि पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वाढोणा (बु़) व वाढोणा (खुर्द) या दोन जुळ्या गावांची चांगलीच फरफट होत आहे.

दोन जुळ्या गावांची होते फरफट
पांढरकवडा तालुका : विकासाला लागला ब्रेक, स्वातंत्र्यानंतरही ग्रामस्थांची परवड
नरेश मानकर पांढरकवडा
येथून १२ किलोमीटर अंतरावरील आणि पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वाढोणा (बु़) व वाढोणा (खुर्द) या दोन जुळ्या गावांची चांगलीच फरफट होत आहे. या दोन्ही गावांचा समावेश दोन वेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आल्याने स्वातंत्र्य मिळून तब्बल ६८ वर्षे लोटूनही ही गावे उपेक्षित आहेत़ परिणामी दोन्हीही गावातील ग्रामस्थ विविध शासकीय योजनांपासून वंचित राहिले आहेत़
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धारणा या गावापासून पश्चिमेकडे तीन किलोमीटर अंतरावर वाढोणा (बु़) व वाढोणा (खुर्द) ही दोन गावे आहे. या दोन्ही गावांच्या मधोमध केवळ एक छोटा नाला आहे़ याच नाल्याच्या एका काठावर वाढोणा (बु़), तर दुसऱ्या काठावर वाढोणा (खुर्द) ही खुर्द आणि बुद्रुक नावाने विभागलेली दोन गावे वसलेली आहेत़ वाढोणा (बु़) हे गाव तीन किलोमीटर अंतरावरील धारणा ग्रामपंचायतीला जोडण्यात आले आहे, तर वाढोणा (खु.) हे गाव तब्बल १० किलोमीटर अंतरावरील घोरदडा ग्रामपंचायतीला जोडण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींच्या या सदोष रचनेमुळे दोन्हीही गावांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे़ ‘ना घरका, ना घाटका’, अशी या गावांची अवस्था झाली आहे़ शासनाच्या विविध योजनांपासून तसेच सवलतींपासून या गावातील ग्रामस्थ अद्याप वंचितच आहेत़ वाढोणा (बु़) आणि वाढोणा (खु.) या दोन्हीही गावांची लोकसंख्या जेमतेम एक हजारांच्या जवळपास आहे. या दोन्हीही गावांमिळून एका स्वतंत्र ग्रामपंचायतींची आवश्यकता आहे़ या दोन्हीही गावांमिळून एक स्वतंत्र ग्रामपंचायत ‘वाढोणा’ या नावाने स्थापन व्हावी, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी आहे़ त्यासाठी गावकऱ्यांनी शासनाकडे अनेकदा निवेदन, अर्ज, विनंत्या केल्या आहेत. मात्र अद्याप या गावांची फरफट संपलीच नाही.
यापूर्वीच्या तत्कालीन युती शासनापासून तर काँग्रेसच्या आघाडी शासनापर्यंत, अनेक मंत्री, संबंधित विभागाचे सचिव, खासदार, आमदार या सर्वांकडे गावकऱ्यांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली. अर्ज, विनंत्यांव्दारे आजर्व केले. मात्र ही महत्त्वाची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबितच आहे़ आता पुन्हा युती शासन सत्तेत आल्याने हे शासन तरी या महत्वाच्या मागणीकडे लक्ष देतील काय, असा संतप्त सवाल वाढोणा (खुर्द) व वाढोणा (बुद्रुक) येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. एकमेकांजवळ असूनही या गावांची फरफट होत आहे. दोन वेगळ्या ठिकाणी त्यांना विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. सोबतच दोनही गावांच्या विकासालाही ‘ब्रेक’ लागला आहे.
ग्रामस्थ शासकीय योजनांपासून वंचित
वाढोणा खुर्द व वाढोणा बुदु्रक, या दोन्हीही गावांची लोकसंख्या एक हजारापर्यंत आहे़ या दोनही गावांमिळून एक स्वतंत्र ग्रामपंचायत असणे आवश्यक आहे़ परंतु स्वतंत्र ग्रामपंचायत तर सोडाच, या दोन जुळ्या गावांपैकी एक गाव तीन किलोमीटरवरील धारणा ग्रामपंचायतीला, तर दुसरे गाव १० किलोमीटरवरील घोरदडा गावाला गेले आहे. त्यामुळे या दोनही गावांतील ग्रामस्थ अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे. शासन नवीन योजना आणते. त्या योजनांमुळे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल व त्यांना विविध प्रकारच्या सुखसोयी मिळतील, अशी अपेक्षा असते. तथापि वाढोणा (बु़) आणि वाढोणा (खु.) ही दोन्हीही जुळी गावे दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना जोडली गेल्यामुळे ग्रामस्थांची उपेक्षा होत आहे़