एसबीआयचे दोन एटीएम दीड वर्षांपासून बंदच
By Admin | Updated: September 7, 2016 01:42 IST2016-09-07T01:42:16+5:302016-09-07T01:42:16+5:30
शहरातील भारतीय स्टेट बँकेचे दोन एटीएम गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जात आहे.

एसबीआयचे दोन एटीएम दीड वर्षांपासून बंदच
ग्राहक त्रस्त : मशीन बसविल्या पण सुरूच झाल्या नाही
दारव्हा : शहरातील भारतीय स्टेट बँकेचे दोन एटीएम गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य बाजारपेठ आणि अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेले एक एटीएम बंद असल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी दोन ठिकाणी दुकाने भाड्याने घेवून त्यामध्ये मशीन बसविल्या. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्यानंतरही हे एटीएम सुरू होवू शकले नाही. परंतु दुकानाचे भाडे मात्र सुरू आहे. भारतीय स्टेट बँकेने तहसील कार्यालयासमोरील वाचनालयाच्या बाजूला आणि गोळीबार चौकातील खासगी दुकाने भाड्याने घेवून त्या ठिकाणी एटीएम मशीन बसविल्या. तहसील कार्यालयासमोर दिवसभर तालुक्यातील लोकांची मोठी गर्दी असते आणि गोळीबार चौकात तर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे ही दोनही ठिकाणे अत्यंत वर्दळीची आहे.
ही महत्त्वाची ठिकाणे पाहता इथे एटीएम असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगली सुविधा मिळू शकते आणि बँकेच्या व्यवहाराला चांगला प्रतिसादसुद्धा मिळू शकतो. परंतु एटीएम मशीन तर बसविण्यात आला पण सुरू मात्र झाल्या नाही. या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मशीन बंद असल्याचे मान्य करीत मशीनमध्ये कॅश टाकणाऱ्या कंपनीकडून कॅश टाकल्या जात नसल्याने एटीएम सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले आणि बँकेकडेही मनुष्यबळ नसल्याने कर्मचाऱ्यामार्फत ते काम केले जावू शकत नाही. त्यामुळे या दोनही ठिकाणचे एटीएम सुरूच न करण्याचा निर्णय बँकेनी घेतला आहे.
असे असले तरी बँकेनी भाड्याने घेतलेल्या दोनही दुकानाचे भाडे सुरू आहे. त्यामुळे बँकेचे नुकसान झाले आणि ग्राहकांना सुविधाही मिळाली नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जवळपास दीड वर्षानंतर हे एटीएम सुरूच न करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ग्राहक चांगल्या सुविधेला मुकणार आहे. या दोन्ही ठिकाणी एटीएम अत्यंत आवश्यक असून ते बंद न करता सुरू करण्यात यावे, अशी मागणी केल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)