इंडिका अपघातात दोन भाविक ठार
By Admin | Updated: October 3, 2016 00:15 IST2016-10-03T00:15:10+5:302016-10-03T00:15:10+5:30
नवरात्रोत्सवानिमित्त माहूर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची इंडिका कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.

इंडिका अपघातात दोन भाविक ठार
खंडाळा घाटातील घटना : माहूर दर्शनासाठी जाणाऱ्यांवर काळाचा घाला
पुसद : नवरात्रोत्सवानिमित्त माहूर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची इंडिका कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात पुसद-वाशिम मार्गावरील खंडाळा घाटात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.
कृष्णा भारतिलक (२१), मनोहर बराटे (२१) दोघे रा. देऊळगाव ता. परतूर जि. अकोला असे मृतांची नावे आहे. तर ज्ञानेश्वर बराटे (४५), हरिभाऊ गावंडे (४५), चालक शेख जब्बार (३५) रा. देऊळगाव अशी जखमींची नावे आहेत. ही सर्व मंडळी माहूर येथे दर्शनासाठी इंडिका कारने रविवारी जात होती. खंडाळा घाटात चालकाचे नियंत्रण गेल्याने कार एका झाडावर जाऊन आदळली. त्यात कृष्णा आणि मनोहर गंभीर जखमी होऊन ठार झाले. तर तीन जखमींना पुसदच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात एवढा भीषण होता की, इंडिका कारचा समोरील भाग पूर्णत: चुराडा झाला होता. या मार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)