जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:38+5:30

पत्नीशी झालेल्या वादात एका क्रुरकर्मा पित्याने आपल्या दीड वर्षीय पोटच्या गोळ्याला जमिनीवर आदळून ठार केल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पांढरकवडापासून १२ किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने पंचक्रोशी हादरून गेली आहे.

Two murders on the same day in the district | जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खून

जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खून

ठळक मुद्देपांढरकवडा, महागाव तालुका : गणेशपूर येथे पित्याने बालकाला आपटले

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा/हिवरा-संगम : जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बापाने दीड वर्षीय मुलाचा तर १६ वर्षीय मुलाने बापाचा खून केल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांनी जिल्हा हादरून गेला. पहिली घटना पांढरकवडा तालुक्यातील गणेशपूर येथे तर दुसरी घटना महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे घडली.
पत्नीशी झालेल्या वादात एका क्रुरकर्मा पित्याने आपल्या दीड वर्षीय पोटच्या गोळ्याला जमिनीवर आदळून ठार केल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पांढरकवडापासून १२ किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने पंचक्रोशी हादरून गेली आहे.
सावन पिंटू चव्हाण असे मृत बालकाचे नाव आहे, तर पिंटू सुधाकर चव्हाण असे क्रुरकर्मा पित्याचे नाव आहे. रविवारी रात्री पिंटू चव्हाण हा नेहमीप्रमाणे दारू पिवून बेड्यावर आला. त्याची पत्नी सैनीबाईने त्याला जेवणाबद्दल आग्रह केला. याच कारणावरून दोघात वाद सुरू झाला. या वादात पिंटू चव्हाणने पत्नी सैनीबाईला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्याकडेवर असलेल्या दिड वर्षीय सावनला हिसकावून तो पारधीबेड्या लगतच्या एका शेतात गेला. तेथे त्याने चिमुरड्या सावनला जमिनीवर आदळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात निरागस सावनचा जागीच मृत्यू झाला. पिंटू चव्हाण एवढ्यावरच थांबला नाही, तर तीन वर्षीय मोठा मुलगा शिवम यालाही त्याने मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच, पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे, वसंत चव्हाण व नाईकवाडे हे तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपी पिंटू चव्हाणला ताब्यात घेतले. चिमुरड्या मुलाला अतिशय क्रुरपणे ठार मारण्याच्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा
या प्रकरणातील आरोपी पिंटू चव्हाण हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी त्याला एका खूनप्रकरणातदेखील अटक करण्यात आली होती, अशी माहिती त्याची पत्नी सैनीबाई हिने पोलिसांना दिली. ही खुनाची घटना आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दी काही वर्षांपूर्वी घडली होती, असे सांगण्यात येते.

हिवरासंगममध्ये मोबाईल फोडल्यावरून पित्याला संपविले
दुसऱ्या घटनेत हिवरासंगम येथे मुलगा सतत मोबाईलच्या नादी असतो तो कोणतेच काम करीत नाही हे पाहून संतापलेल्या वडिलाने मुलाचा चार्जिंग असलेला मोबाईल फोडला. यावरून संतापलेल्या मुलाने थेट वडिलावर हल्ला चढवत खाटेच्या ठाव्याने जीव जाईपर्यंत डोक्यात प्रहार केले. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मुलगा १६ वर्षाचा असल्याने विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून त्याच्याविरोधात महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विधीसंघर्षग्रस्त बालक हा गावातीलच ट्रकवर क्लिनर म्हणून कामाला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या हाताला काम नव्हते, यावरूनच वडील सतत त्याला काही कामधंदा करीत नाही, मोबाईलवर खेळत राहतो असे टोमणे मारत होते. यातूनच दोघा बापलेकात वाद पेटला. वडिलाने रागाच्या भरात घरात चार्जिंग लावलेला मोबाईल फोडला. हे पाहून मुलाने थेट वडिलाला मारायला सुरुवात केली. हाणामारी करीत असतानाच मुलाच्या हातात खाटेचा ठावा लागला. त्याने त्या ठाव्यानेच वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळून वडिलाचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या काकाला माहीत झाला. त्यांनी तातडीने धाव घेऊन मुलाच्या तावडीतून वडिलाची सुटका केली. तो काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हता, शेवटी विधीसंघर्षग्रस्त बालकाला दोरीने खांबाला बांधून ठेवले. घटनेची माहिती पोलीस पाटील प्रवीण कदम यांना दिली. त्यांनी महागाव ठाणेदारांना या घटनेबाबत सांगितले. महागाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. मुलगा व वडील दोघांनाही दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येत आहे.

वडिलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न
मोबाईल फोडल्याचा राग आल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकाने वडिलाला डोक्यावर प्रहार करून गंभीर जखमी केले. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या वडिलाला तुराट्याच्या गंजीवर ठेऊन पेटवून देण्याच्या तयारीत विधीसंघर्षग्रस्त बालक होता. तो मधात आलेल्या काकालाही जुमानत नव्हता. अखेर त्याला शेजाऱ्यांच्या मदतीने खांबाला बांधून ठेवले. झटापटीत त्याला वेळेवर आगपेटी मिळाली नाही. त्यामुळे वडिलाला अर्धमेल्या अवस्थेत जाळता आले नाही. मात्र डोक्यावर गंभीर जखम झाल्याने वडिलांचा काही क्षणातच मृत्यू झाला.

Web Title: Two murders on the same day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून