दोन लाख शेतकऱ्यांनी भरले ३९ कोटी रूपये
By Admin | Updated: August 28, 2016 00:19 IST2016-08-28T00:19:20+5:302016-08-28T00:19:20+5:30
पंतप्रधान पीक विमा योजनेतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख

दोन लाख शेतकऱ्यांनी भरले ३९ कोटी रूपये
राष्ट्रीयकृत बँकांची चुप्पी : निम्म्या क्षेत्राला पीक विम्याचे कवच, सर्वाधिक सोयाबीन उत्पादक
यवतमाळ : पंतप्रधान पीक विमा योजनेतून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख १८ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. यामुळे पाच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांना संरक्षण मिळाले आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी हा आकडा अद्यापही गुलदस्त्यात ठेवला आहे. यामुळे एकूण पीक संरक्षित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेतील पिकांचा विमा उतरविताना प्रारंभी अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. अर्जाची अट शिथिल झाल्यानंतर विमा कंपनीकडे विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. १० जुलैपर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात आले. या अंतिम अहवालाची गोळाबेरीज जिल्हा बँकेने केली आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांना अद्यापही पीक विम्याची गोळाबेरीज करता आली नाही. यामुळे सहकार दप्तरी राष्ट्रीयकृत बँकाचा अहवाल निरंक आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी हा अहवाल अद्यापही जिल्हा प्रशासनापुढे सादर केला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानुसार दोन लाख १८ हजार शेतकऱ्यांनी पाच लाख हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला आहे.
यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि कडधान्याच्या पिकांचा समावेश आहे. कापसाचा विमा उतरविण्यासाठी हेक्टरी १७०० रूपयांचा खर्च होता. त्या तुलनेत सोयाबीनच्या विम्यासाठी कमी रक्कम होती. यामुळे सर्वाधिक विमा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उतरविल्याची बाब पुढे आली आहे. (शहर वार्ताहर)