विहिरीत दरड कोसळून दोन मजूर ठार
By Admin | Updated: February 1, 2015 23:04 IST2015-02-01T23:04:20+5:302015-02-01T23:04:20+5:30
विहिरीचे खोदकाम सुरू असताना दरड कोसळून दोन मजूर ठार झाले तर १० वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. ही घटना उमरखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

विहिरीत दरड कोसळून दोन मजूर ठार
उमरखेड : विहिरीचे खोदकाम सुरू असताना दरड कोसळून दोन मजूर ठार झाले तर १० वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. ही घटना उमरखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
कांताराव रामराव नाईक (३५), देवबा नागोराव गायकवाड (४०) असे ठार झालेल्या मजुरांचे नावे आहे. तर योगेश तांबारे (१०) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याला नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पिंपळदरी येथील सुशीला मनोहर कांबळे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. या विहिरीमध्ये कांताराव, विठोबा, योगेश काम करीत होते. अचानक विहिरीच्या वरच्या बाजूने असलेली दरड कोसळली. त्या दरडीतील मोठा दगड या तिघांच्या अंगावर पडला. त्यात कांताराव आणि देवबा जागीच ठार झाले तर योगेशच्या डोक्याला व पायाला गंभीर जखमा झाल्या. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ तिघांनाही बाहेर काढण्यात आले. योगेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला नांदेड येथे पाठविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच उमरखेडचे नायब तहसीलदार राजेश चव्हाण, पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची तक्रार जयभीम कांबळे यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)