पुलावरून ट्रक कोसळून दोन ठार
By Admin | Updated: July 11, 2015 00:02 IST2015-07-11T00:02:15+5:302015-07-11T00:02:15+5:30
भरधाव ट्रक पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोंघारा गावानजीक शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

पुलावरून ट्रक कोसळून दोन ठार
कोंघारा येथील घटना : ट्रकच्या केबीनचा झाला चुराडा
पांढरकवडा : भरधाव ट्रक पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोंघारा गावानजीक शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या केबीनचा पूर्णत: चुराडा झाला होता.
संदीप महेश यादव (२२) रा.घुगरी कलाई व सुनील डिनू यादव (२६) रा.ठामरी, जि.शिवणी (मध्य प्रदेश) अशी मृतांची नाव आहे. जबलपूरवरून हैदराबादकडे ट्रक एम.पी.२०-एच.बी.४९१५ हा विटा व टाईल्सचे तुकडे घेऊन जात होता. कोंघारानजीक चालकाचे नियंत्रण सुटून पुलावरून खाली कोसळला. ही घटना कोंघारा येथील एका महिला आणि तिच्या मुलीने पाहिली. त्यांनी आरडाओरड करत ही घटना जाणाऱ्या-येणाऱ्यांना सांगिली.
कोंघारा व दातपाडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ट्रक चालक संदीप व बाजूला बसलेला सुनील हा ट्रकच्या केबीनमध्ये पूर्णत: दबून होता. सुनीलचा एक हात तुटून वेगळा झाला होता. अपघातस्थळावर प्रत्येक जण हळहळताना दिसत होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष माने सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर दोन्हीही मृतदेह येथील उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)