लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : दिग्रस ते पुसद बायपास मार्गावर एसटी बस व दोन दुचाकींचा अपघात झाला. यात दोन युवक जागीच ठार, तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. पवन मुलसिंग गावंडे (२०) आणि रवि रमेश पुंड (२१) दोघेही रा.देवनगर दिग्रस अशी मृतांची नावे आहे. हे दोघे स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन आपल्या गावी देवनगरला जात होते. ते आपल्या दुचाकीने (एम.एच.२९/बी.एम. ४२३४) परत जात असताना, पुसद बायपास मार्गावर समोरून येणाऱ्या परभणी आगाराच्या एसटी बसने (एम.एच.२०/बी.एल.२५२७) त्यांना धडक दिली. दुचाकी चालकांसह त्यांचे दोन मित्रही दुसऱ्या दुचाकीने (एम.एच.३८/वाय.६४३९) देवनगरला जात होते. दोनपैकी एका दुचाकीने बसला मागून धडक दिली. दुसरी दुचाकी बसवर समोरासमोर आदळली. बसला मागून धडक देणाऱ्या दुचाकीवरील पवन गावंडे व रवी पुंड यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील केशव प्रल्हाद चव्हाण (३६) रा.श्रीराम विहार दिग्रस गंभीर जखमी झाला. त्याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच, ठाणेदार सोनाजी आमले, एपीआय धीरेंद्रसिंग बिलवाल व पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी बसचालक संतोष किसन सातोडे (३७) रा.परभणी याला अटक केली. ही बस परभणी येथून चंद्रपूरकडे जात होती.
देवनगरवर शोककळामृत रवी पुंड आणि पवन गावंडे हे दोन्ही तरुण देवनगर परिसरातील रहिवासी होते. दोघांच्याही मृत्युमुळे या परिसरात शोकाकुल वातावरण होते. दुपारी घटना घडल्याचे समजताच या परिसरातील अनेक नागरिकांनी पुसद बायपासकडे धाव घेतली होती. तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. दोन्ही युवकांचे चिरडलेले मृतदेह बघून नागरिकांना दु:ख अनावर झाले होते.