पोलिसांच्या वर्दीत आलेल्यांनी दोन शेतकऱ्यांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:48 IST2021-08-13T04:48:23+5:302021-08-13T04:48:23+5:30
राजू एकनाथ नानगुडे आणि शांताराम खिरीड, अशी लुबाडणूक झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहे. हे दोघे गोरे (बु.), ता. हवेली, जि. ...

पोलिसांच्या वर्दीत आलेल्यांनी दोन शेतकऱ्यांना लुटले
राजू एकनाथ नानगुडे आणि शांताराम खिरीड, अशी लुबाडणूक झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहे. हे दोघे गोरे (बु.), ता. हवेली, जि. पुणे येथील रहिवासी आहेत. येथील काही मजूर कामाच्या शोधात पुणे येथे गेले. त्यातील एकाने राजू कांबळे असे नाव सांगत शांताराम खिरीड व राजू नानगुडे यांच्याशी पुण्यात ओळख केली. तालुक्यात बैल स्वस्त मिळतात असे सांगून, त्याने येथे बैलाच्या खरेदीसाठी येण्याची गळ घातली. त्याच्यावर विश्वास ठेवून हे दोघे शेतकरी पुण्याहून ट्रॅव्हल्सने पुसदकडे निघाले.
पुसद येथे शिवाजी पुतळ्यापासून कथित राजू कांबळे याने या दोघांना प्रवासी वाहनातून खडका येथे आणले. तेथून पेढीकडे जाणाऱ्या फाट्यावर एका शेतकऱ्याच्या गोठ्याकडे नेले. दरम्यान, एम.एच. १७-३९३७ या क्रमांकाच्या जीपमधून सहाजणांचे टोळके तेथे दाखल झाले. त्यापैकी दोघांच्या अंगावर पोलिसांची वर्दी होती. या टोळीने दोन्ही शेतकऱ्यांना काठीने मारहाण करून जबरीने एक लाखाची बॅग पळविली. लुबाडले गेल्याचे लक्षात येताच दोन शेतकऱ्यांनी खडका येथील पोलीस पाटील नितीन ठोके यांना आपबिती कथन केली. नंतर त्यांनी महागाव पोलीस ठाणे गाठले. परंतु, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. आरोपींची नावे व पत्ता सांगा म्हणून मुस्कटदाबी केली. लुटारूंपैकी एकजण सारखणी, ता. माहूर, तर मध्यस्थी करणारा धारमोहा येथील असल्याचे समजते.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित आरोपींकडून त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ४९ हजार रुपये जमा करवून घेतले आहे. गुरुवारी पुन्हा ४७ हजार ५०० रुपये ऑनलाईन पेमेंट जमा करून घेतले. परंतु, आरोपीचा शोध न घेता लुटल्या गेलेल्या शेतकऱ्यांनाच दम भरला. वृत्त लिहिस्तोवर यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
कोट