विहिरींच्या पैशाच्या प्रतीक्षेत गेले दोन जीव

By Admin | Updated: March 5, 2016 02:35 IST2016-03-05T02:35:59+5:302016-03-05T02:35:59+5:30

शेती समृद्ध करण्यासाठी सिंचनाची सोय करण्याचा सल्ला प्रशासन देत असते. त्यासाठी धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला.

Two creatures awaiting the well of the well | विहिरींच्या पैशाच्या प्रतीक्षेत गेले दोन जीव

विहिरींच्या पैशाच्या प्रतीक्षेत गेले दोन जीव

विधवा मातेचा टाहो : प्रशासनाच्या निगरगट्टतेने शेतकऱ्यांचा बळी
यवतमाळ : शेती समृद्ध करण्यासाठी सिंचनाची सोय करण्याचा सल्ला प्रशासन देत असते. त्यासाठी धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला. पण या योजनेत आधी शेतकऱ्याला स्वत:च्या खर्चाने विहीर बांधवी लागते. मग प्रशासन पैसे देते. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी बांधल्या तरी शासकीय निधी त्यांच्या पदरात पडला नाही. दारव्हा तालुक्यातील हदगाव आणि घाटंजी तालुक्यातील पारव्याच्या शेतकऱ्यांनी तर निधीची वाट पाहात प्राण सोडले. आता त्यांच्या वृद्ध माताच जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसल्या आहेत. पण त्यांच्या उपोषणाची दखल घेण्याचीही सवड प्रशासनाला मिळालेली नाही.
काही दिवसांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने सिंचन विहीर पूर्ण केल्यानंतरही मोबदला मिळाला नाही म्हणून बेमुदत उपोषण सुरू केले होते. जिल्हा प्रशासनाने यामध्ये तत्काळ लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. हे प्रकरण निकाली निघते ना निघते, तोच दारव्हा तालुक्यातील हादगावच्या सुमित्रा बबनराव गावंडे या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सुमित्राबार्इंचे पती १९ वर्षापूर्वी अपघातात गेले. तिच्या पती गेल्यानंतर दोन मुलांना लहानाचे मोठे सुमित्राबाईने केले. शासनाच्या योजनेतून विहीर मंजूर झाली. मुलाने कर्ज काढून विहीर बांधली. विहिरीसाठी १ लाख ९० हजार मंजूर झाले.
मात्र १ लाख ३० हजार रूपयेच सुमित्राबाईला भेटले. उर्वरित ६० हजार रूपये भेटायचे आहे. यासाठी सुमित्राबाई आणि त्यांचा मुुलगा दीपक गावंडे यांनी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजविल्या. मात्र यानंतरही त्यांना उर्वरित पैसे भेटले नाही.
विहीर पूर्ण झाल्याने कर्जदारांचा तगादा सुरूच झाला होता. शासनाचे पैसे नाही. वावरात पीक नाही, यामुळे दीपक संकटात सापडला. त्याचाच त्याने धस्का घेतला. त्यातच दीपकचा २२ आॅगस्ट २०१५ ला मृत्यू झाला. मात्र शासनाला जाग आली नाही. यामुळे न्यायाच्या लढाईसाठी सुुमित्राबाई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्याच बाजूला घाटंजी तालुक्यातील पारव्याच्या शशिकला तुुकाराम भवरे उपोषणाला बसल्या आहेत. त्यांची स्थितीही अशीच आहे. त्यांना पॅकेजमधून विहीर मंजूर झाली. ईश्वरचिठ्ठीने त्यांना विहीर मिळाली होती. २०१० मध्ये विहीर पूर्ण झाली. यासाठी शशिकलाबाईने कर्ज काढले होते.
सहा वर्ष झाले पैसे मिळाले नाही. शासनदरबारी सारख्या येरझारा मारल्या, पण उपयोग झाला नाही. यामुळे शशिकलाबाईचा मुलगा त्रिभुवन भवरे याने आत्महत्या केली. पण अजूनही विहिरीचे पैसे भेटले नाही. यामुळे शशिकलाबाई उपोषणाला बसल्या आहेत. (शहर वार्ताहर)

विहिरीचे मस्टर का निघत नाही ?
जिल्ह्यातील १६ तालुक्यात सिंचन विहिरींचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या शेकडो येरझारा होत आहे. मात्र मस्टरच काढले जात नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. यानंतरही स्थानिक यंत्रणा हा विषय गांभीर्याने घेत नाही. आता तर बळीराजा चेतना अभियान सुरू आहे. यानंतरही शासनातील अधिकारी हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत.

बळीराजानेच फाडला अभियानाचा बुरखा
ज्या जिल्हा कचेरीच्या भिंतींवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी चित्रे रंगविण्यात आली, त्याच चित्रांपुढे आता निराश शेतकरी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे बळीराजा चेतना अभियानाच्या फलिताबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. धडक सिंचन विहिरीचा निधी शेतकऱ्यांना येरझारा मारल्यानंतरही मिळत नाही. चिरीमिरी न देणाऱ्यांचे बिल रोखले जाते. पंचायत विभागात गेल्यावर हा प्रकार दिसतो. अशाच प्रकरणात दोन मातांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे टाहो फोडला. भ्रष्ट यंत्रणेचा बुरखाच त्यांनी फाडला आहे.

Web Title: Two creatures awaiting the well of the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.