दोन बालकांना बसने चिरडले

By Admin | Updated: March 26, 2015 02:16 IST2015-03-26T02:16:30+5:302015-03-26T02:16:30+5:30

बसस्थानक चौकातील सिग्नलवर रस्ता ओलांडणाऱ्या दोन चिमुकल्यांना भरधाव एसटी बसने चिरडले.

Two children were crushed by the bus | दोन बालकांना बसने चिरडले

दोन बालकांना बसने चिरडले

यवतमाळ : बसस्थानक चौकातील सिग्नलवर रस्ता ओलांडणाऱ्या दोन चिमुकल्यांना भरधाव एसटी बसने चिरडले. यात १० वर्षीय बालिका जागीच ठार तर तिच्या कडेवर असलेल्या दोन वर्षीय बालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
वैशाली शिखिलदार भोसले (१०) आणि शेरा लखन पवार (२) रा. विट्टभटी परिसर तलावफैल यवतमाळ असे मृत चिमुकल्यांची नावे आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता चार ते पाच संख्येने असलेली मुली आर्णी रोडवरून गार्डन रोडकडे जात होती. त्याच वेळी अचानक सिग्नल सुटला आणि अमरावती-यवतमाळ ही एसटी बस (एम.एच-०७-सी-७५२२) भरधाव वेगाने बसस्थानकात जाण्यासाठी निघाली. अचानक बालकांचा घोळका बससमोर आला. काही कळायच्या आत वैशाली भोसले ही बालिका बसच्या समोरील चाकाखाली आली. तर तिच्या कडेवर असलेला शेरा पवार हा बसच्या खाली फेकला गेला. बसचे चाक अंगावरून गेल्याने वैशाली जागीच ठार झाली तर शेरा गंभीर जखमी झाला.
अपघात होताच अनेकांनी या ठिकाणी धाव घेतली. जखमी बालकाला तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळावर रक्ताचे थारोळे पडले होते. बालिकेचा मृतदेह पाहून प्रत्येक जण हळहळत होता. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (शहर वार्ताहर)

विस्कळीत वाहतूक अपघातास कारणीभूत
बसस्थानक चौकात सिग्नल असले तरी वाहतूक नेहमी विस्कळीत असते. प्रत्येकाला सिग्नल सुटल्यावर समोर जायची घाई असते. अनेकदा तर सिग्नल चालू असतानाही दारव्हा मार्गावरून आर्णी मार्गाकडे बिनधास्तपणे वाहने घेऊन जातात. त्याच वेळी बसस्थानकाकडून येणारी वाहने येतात. त्या ठिकाणी अपघात होण्याची नेहमी भीती असते. वाहतूक पोलीस केवळ आपल्या चौकीसमोर उभे राहून हा प्रकार पाहत असतात. त्यातच पायदळ जाणारेही सिग्नलकडे लक्ष न देता समोर निघतात. अशा स्थितीत अपघात होतात. अनेकदा या चौकातील सिग्नलवरील काही दिवे बंद असतात. त्यामुळे वाहन चालक गोंधळतात. त्यामुळेही अपघातास आमंत्रण मिळते.

Web Title: Two children were crushed by the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.