बारावीत पीपल्स ज्युनिअरची तेजस्विनी कोकाटे अव्वल
By Admin | Updated: May 31, 2017 00:23 IST2017-05-31T00:23:17+5:302017-05-31T00:23:17+5:30
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गेल्या दहा वर्षांची परंपरा कायम

बारावीत पीपल्स ज्युनिअरची तेजस्विनी कोकाटे अव्वल
मुलीच अव्वल : जिल्ह्याचा निकाल ८४.८० टक्के, सर्वाधिक दिग्रस, सर्वात कमी कळंब
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गेल्या दहा वर्षांची परंपरा कायम राखत मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातील ८८.५५ टक्के विद्यार्थिनींनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तर ८१.६३ विद्यार्थी बारावी सर करू शकले. मात्र एकंदर जिल्ह्याची टक्केवारी विद्यापीठातून ढांग असून जिल्ह्याचा सरासरी निकाल ८४.८० टक्के लागला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातून वाघापूर येथील पीपल्स कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी तेजस्वीनी प्रशांत कोकाटे ही अव्वल ठरली आहे. तिला ९६.७६ टक्के (६५० पैकी ६२९) गुण मिळाले.
२८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा शांततेत पार पडली. जिल्ह्यातील ३३ हजार ४६१ विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षेचा अर्ज भरला होता. परंतु, त्यापैकी ३३ हजार ४१५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यात १८ हजार १०८ विद्यार्थी तर १५ हजार ३०७ विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेला बसलेल्या या विद्यार्थ्यांपैकी एकूण २८ हजार ३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ७८२ असून विद्यार्थिनींची संख्या १३ हजार ५५४ इतकी आहे. विशेष म्हणजे, परीक्षेला बसणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी असूनही त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षाही अधिक आहे.
शंभर नंबरी यश
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावलेली असतानाच तब्बल १५ विद्यालय-महाविद्यालयांनी १०० टक्के निकालाची उंची गाठली आहे. या १५ महाविद्यालयांनी तिन्ही विज्ञान, कला, वाणिज्य अशा तिन्ही शाखांमध्ये १०० टक्के यश मिळविले आहे. याशिवाय काही महाविद्यालयांनी तीनपैकी एखाद्या शाखेचा निकाल १०० टक्के घेतला आहे. जवाहरलाल दर्डा कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ, नंदूरकर कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय रूईवाई, साईबाबा विद्यालय टेंभी, दिनबाई महाविद्यालय दिग्रस, मोहनाबाई हायस्कूल दिग्रस, दामोदर पाटील महाविद्यालय दिग्रस, शिवाजी विद्यालय भोजला, तेजमल गांधी महाविद्यालय ब्राह्मणगाव, हनिफ मास्टर उर्दू हायस्कूल, संत तुकाराम महाराज कनिष्ठ महाविद्यालय राणी अमरावती, विराणी महाविद्यालय यवतमाळ, विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव, एसपीएम विद्यालय घाटंजी, समर्थ विद्यालय घाटंजी या शाळा-महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
तेजस्विनी म्हणते, अभियंता होणार
तेजस्विनीने हे यश मिळविण्यासाठी दररोज सात ते आठ तास अभ्यास केला. तेजस्विनी म्हणाली, मला अभियंता व्हायचे आहे. त्या दृष्टीने भविष्यात वाटचाल करणार आहे. ती आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालय आणि सी-इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांना देते.