डॉक्टरवर अत्याचाराचा प्रयत्न
By Admin | Updated: October 2, 2015 07:03 IST2015-10-02T07:03:54+5:302015-10-02T07:03:54+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर दोन तरुणांनी अत्याचाराचा

डॉक्टरवर अत्याचाराचा प्रयत्न
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर दोन तरुणांनी अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास घडली. त्याचवेळी पोलिसांचे गस्तीपथक या परिसरात पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात दोन तरुणांना तत्काळ अटक केली आहे. या घटनेने मेडिकल परिसराची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
मेडिकल परिसरातील वसतिगृहात राहणारी एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर रात्री ९.१५ वाजता आपल्या ड्युटीवर जात होती. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत दोन तरुणांनी तिला पकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाने घाबरलेल्या डॉक्टरने आरडाओरडा केली. सुदैवाने त्याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे गस्त पथक त्या परिसरातून जात होते. हा प्रकार दिसताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत दोनही तरुण पसार झाले होते. याची माहिती वायरलेसवरून चार्ली पथकाला दिली. तसेच त्याच परिसरात असलेल्या काही डॉक्टरांच्या दुचाकी घेऊन मदनेसह इतर पोलिसांनी शोध सुरू केला. त्यावेळी आरोपी प्रवीण वासुदेव सोनवणे (२४), देवानंद देवराव भिवनकर (३०) दोघे रा. कोळंबी ता. यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले. यातील प्रवीणने वयाच्या १५ व्या वर्षीच खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तर देवानंदवर लुटपाटीच्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरला चाकूच्या धाकावर लुटल्याच्या घटनेपाठोपाठ आता महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
२ आॅक्टोबरचा रुग्णालय प्रशासनाला अल्टीमेटम दिला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना न झाल्यास कामबंद आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर कॅन्डल मार्च काढून निषेध केला.
विद्यार्थ्यांच्या दबावानंतर महाविद्यालय प्रशासनाला जाग आली असून मेडिकल पसिरात वाढलेली झुडूपे तोडण्यासाठी जेसीबी लावण्यात आला. सातत्याने एकाच ठिकाणी अशा हल्ल्याच्या घटना होत असल्याने प्रशासनाकडून आता वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अधिष्ठाता व डॉक्टरच्या नावे ठाण्यात ‘साना’
सदर प्रशिक्षणार्थी डॉक्टरला वैद्यकीय तपासणीसाठी महिला पोलीस कर्मचारी अपघात कक्षात घेऊन गेली असता तब्बल एका तासपर्यंत कुणीही तिकडे लक्ष दिले नाही. अधिष्ठातांनी घटनास्थळावर येण्याचे सौजन्य दाखविले नाही. उलट एक तासानंतर न्यायवैद्यक विभागातील डॉ. अविनाश वाघमोड हे तपासणीसाठी आले. त्यांनी यावेळी महिला पोलीस शिपायाशी असभ्य भाषेचा वापर केला. याची तक्रार अधिष्ठाता डॉ. राठोड यांच्याकडे केली असता त्यांनीही डॉक्टरची बाजू घेतली. तपास कामी सहकार्य मिळत नसल्याने एसडीपीओ राहुल मदने यांच्या सूचनेवरून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अधिष्ठाता व संबंधित डॉक्टरविरोधात साना नोंदविण्यात आला आहे.
अधिष्ठाता म्हणतात, माझी जबाबदारी नाही
मेडिकल परिसरात सातत्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर हल्ले होत आहे. सुरक्षेच्या मागणीचे निवेदन घेऊन महिला डॉक्टर अधिष्ठाता डॉ.अशोक राठोड यांच्याकडे गेले. त्यावेळी अधिष्ठातांनी या विद्यार्थ्यांनाच खडेबोल सुनावत तुमच्या सुरक्षेची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाची नाही. तुमची सुरक्षा तुम्हीच करा, असे म्हटले. त्यामुळे प्रशिक्षणार्थी संतप्त झाले. सायंकाळी या डॉक्टरांंनी अधिष्ठातांना घेराव घालून जाब विचारला.