संपत्ती हडपण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 21:56 IST2018-08-09T21:56:05+5:302018-08-09T21:56:41+5:30
पतीच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेली स्थावर व जंगम मालमत्ता पत्नी व मुलीला डावलून हडपण्याचा प्रयत्न दिर व नणंद यांच्याकडून होत असल्याचा आरोप येथील एका महिलेने केला असून त्यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र पोलिसांनी या तक्रारीवरून गैरअर्जदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला नाही.

संपत्ती हडपण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पतीच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेली स्थावर व जंगम मालमत्ता पत्नी व मुलीला डावलून हडपण्याचा प्रयत्न दिर व नणंद यांच्याकडून होत असल्याचा आरोप येथील एका महिलेने केला असून त्यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र पोलिसांनी या तक्रारीवरून गैरअर्जदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला नाही.
येथील अब्दुल रशिद सलाट यांचे २२ नोव्हेंबर १९९७ मध्ये कार अपघातात निधन झाले. त्यांच्या नावे वडगाव (धांदीर) येथे ५.५ एकर शेती व चिखलगाव येथे तीन भूखंड तसेच काही बँकामध्ये खात्यात रक्कम अशी चल व अचल संपत्ती होती. त्यांची पत्नी फरझाना व मुलगी इफ्तेशाम हेच अधिकृत वारस होते. मात्र या वारसांना डावलून दिर असलम सलाट यांनी रशिदभाई यांची सर्व संपत्ती बनावट दस्तऐवज तयार करून आपले व बहिण फरिदा यांचे नावे करून घेतली. पत्नी फरझाना ही अशिक्षित असल्याने अनेक वर्षे ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही.
तसेच रशिद सलाट यांचे काही बँकामध्ये बचत खाते व भविष्य निर्वाह निधी खाते होते. या खात्यांमध्येही लाखो रूपये जमा होते. त्या रक्कमेचीही असलम यांनी विल्हेवाट लावली. ही बाब घरात आढळून आलेल्या कागदपत्रांवरून आता फरझाना व इफ्तेशाम यांच्या निदर्शनास आली व त्यांना धक्काच बसला.
दरम्यान रशिद यांच्या मृत्यूनंतर दिर असलम सलाट यांनी भावजय फरझाना व पुतणी इफ्तेशाम यांचा कसा छळ केला, याची आपबिती दोघींनीही पत्रकार परिषदेतून कथन केली. फरझाना सलाट यांनी दिर असलम व नणंद फरिदा यांच्या विरोधात ६ आॅगस्टला वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.