बोगस आदेश तयार करून वृक्षतोडीचा प्रयत्न

By Admin | Updated: July 16, 2015 02:38 IST2015-07-16T02:38:51+5:302015-07-16T02:38:51+5:30

उपविभागीय अधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करून सागवान तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जनुना येथील शेतकरी गणपत यमनाराव मस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Try the tree trunk by creating bogus orders | बोगस आदेश तयार करून वृक्षतोडीचा प्रयत्न

बोगस आदेश तयार करून वृक्षतोडीचा प्रयत्न

दिशाभूल : जनुनाच्या शेतकऱ्यावर गुन्हा
पुसद : उपविभागीय अधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करून सागवान तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जनुना येथील शेतकरी गणपत यमनाराव मस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी गणपत मस्के यांनी वर्ग २ च्या जमिनीवरील सागवान तोडण्यासाठी पुसद उपवनसंरक्षकांकडे अर्ज दाखल केला. मात्र ही जमीन वर्ग २ ची असल्याने त्यावरील सागवानाच्या मालकी हक्कासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. यासाठी मस्के यांनी नायब तहसीलदार यांचे बनावट नाहरकत प्रमाणपत्र २५ फेब्रुवारी २०१५ रोजी आणि उपविभागीय अधिकारी यांचा २ फेब्रुवारी २०१५ रोजींचा आदेश तयार केला. या विषयी पुसद वनसंरक्षकांना शंका आली. यावरून उपवनसंरक्षक कार्यालयाने नायब तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडून खात्री केली असता एनओसी आणि आदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
मस्के यांनी शेत सर्वेनंबर १९९, क्षेत्रफळ ४ हेक्टर ४५ आर या जमिनीवरील सागवान तोडण्यासाठी ही सर्व उठाठेव केली. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू आणि नायब तहसीलदार देवानंद धबाले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या वरून सदर शेतकऱ्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर शेतकऱ्याने स्टॅम्प कोठून तयार केला, स्वाक्षरी स्वत: केली की इतरांकडून करवून घेतली, याचाही शोध घेतला जात आहे. शासनाची दिशाभूल करणाऱ्या या प्रकारामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. अशी आणखी काही प्रकरणे घडली असावी काय, या दृष्टीनेही तपासकार्य सुरू केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Try the tree trunk by creating bogus orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.