काट्याकुट्याचा तुडवित रस्ता.. शाळेला चल माझ्या दोस्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:19 IST2017-08-29T23:19:15+5:302017-08-29T23:19:37+5:30
काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाला चल माझ्या दोस्ता... ही कविता तालुक्यातील तिवडीच्या विद्यार्थ्यांचे जीवनगाणे बनली आहे.

काट्याकुट्याचा तुडवित रस्ता.. शाळेला चल माझ्या दोस्ता!
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाला चल माझ्या दोस्ता... ही कविता तालुक्यातील तिवडीच्या विद्यार्थ्यांचे जीवनगाणे बनली आहे. चक्क दोन किलोमीटर चिखल, गोटे तुडवित, टोंगळ्यापर्यंत मातीने माखल्यावरच त्यांना शाळेत पोहोचता येते. ही अवस्था पाहून गावकरी संतप्त असले तरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला त्याचे सोयरसूतक नाही.
गुणवान विद्यार्थी देणाºया उमरखेड तालुक्यात सध्या शिक्षणाची अवस्था बिकट बनली आहे. तिवडी जुनी या गावात तर शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही. रस्त्याच्या नावावर जी वाट काढण्यात आली, त्यावर चिखल, मोठ मोठे खड्डे यांचे अधिराज्य असल्याने हा रस्ता चालण्यासाठी आहे की छळण्यासाठी, असा प्रश्न पडतो.
जुनी तिवडी आणि नवीन तिवडी या गावांत दोन किलोमीटरचे अंतर आहे. शाळेत जाण्यासाठी जुनी तिवडीतील विद्यार्थ्यांना हे दोन किलोमीटरचे अंतर चिखलातून जावे लागते. रस्त्यातील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावकरीच त्रस्त झाले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग या समस्येकडे डोळेझाक करीत आहे.
याबाबत सरपंच राजेश नलावडे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु, बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेण्यात आली नाही. या भागातील लोकप्रतिनिधींनाही कळविण्यात आले. पण त्यांच्याकडूनही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्याची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी तिवडी गावकºयांनी केली आहे.