आंध्रप्रदेशातून मॅग्नीजसाठी आलेले ट्रक अखेर परतले
By Admin | Updated: July 9, 2014 23:53 IST2014-07-09T23:53:44+5:302014-07-09T23:53:44+5:30
येथून २५ किलोमीटर अंतरावरील आंध्रप्रदेश सीमेवरील हिवरी येथील मॅग्नीज उत्खननाचे प्रकरण सात दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ ‘लोकमत’चा दणका बसताच झोपलेले तहसील प्रशासन खडबडून

आंध्रप्रदेशातून मॅग्नीजसाठी आलेले ट्रक अखेर परतले
नीलेश यमसनवार - पाटणबोरी
येथून २५ किलोमीटर अंतरावरील आंध्रप्रदेश सीमेवरील हिवरी येथील मॅग्नीज उत्खननाचे प्रकरण सात दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ ‘लोकमत’चा दणका बसताच झोपलेले तहसील प्रशासन खडबडून जागे झाले अन् संबंधित शेतकऱ्याच्या विरोधामुळे मॅग्नीज नेण्यासाठी आलेले चार ट्रक, एक जेसीबी मशीन अखेर परत गेली.
गेल्या सात दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये मॅग्नीजच्या अवैध उत्खननाचे वृत्त प्रकाशित होताच पांढरकवडा तहसीलमधील नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला होता. त्यांनी उत्खनन करण्यात आलेल्या मॅग्नीज दगडांच्या ढिगाचा पंचनामा करून सदर शेतकऱ्याच्या सुपूर्दनाम्यावर मॅग्नीज दडक जागीच ठेवून ते खाली हाताने परतले होते. या मॅग्नीज उत्खनन प्रकरणात कोणतीही मोठी कारवाई न करता केवळ कागदोपत्रीच कारवाईचा फास आवळण्यात आला होता. त्यानंतर अहवाल पाठविण्यापलीकडे महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही़ दरम्यान पंचनामा करण्यात आलेले मॅग्नज दगड भरण्याकरिता मंगळवारी ८ जुलैला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास हैद्राबादजवळील एका कंपनीचे चार ट्रक आणि जेसीबी मशीन आली होती, असे वृत्त आहे. मात्र शेतकऱ्याच्या विरोधानंतर ते चार ट्रक रिकामे परत गेले़ ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यापासून उत्खनन संपूर्णपणे बंद झाले होते़ मात्र आठ-दहा दिवसांच्या कालावधीनंतर मॅग्नीज माफिया पुन्हा सक्रिय झाले व त्यांनी मंगळवारी चार ट्रक लावून उत्खनन करण्यात आलेला मॅग्नीज दगड भरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो विफल झाला़
सदर दगडाचे उत्खनन गेल्या दीड वर्षांपासून सुरू असहे. परिसरातील मॅग्नीज, लाईमस्टोन, सिलीकॉनचा अमूल्य साठा आता आंध्रातील माफियांच्या निशाण्यावर असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे़ तहसीलचे काही कर्मचारी व वन कर्मचारी यांना विश्वासात घेऊनच हे उत्खनन सुरू असल्याची चर्चा आहे. सुमारे एक वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्याने मॅग्नीज दिले, ती कंपनी वेगळी व आता मॅग्नीज घेणारी कंपनी वेगळी असल्याची माहिती आहे. सदर कंपनी या भोळ्याबाभड्या, अशिक्षित, गरीब शेतकऱ्यांना केवळ ५०० रूपये ब्रास प्रमाणे मोबदला देत असल्याची माहिती आहे़