ट्रक दरोड्यात साजीद टोळीवर संशय
By Admin | Updated: May 7, 2016 02:28 IST2016-05-07T02:28:39+5:302016-05-07T02:28:39+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील करंजी पुलानजीक ट्रकवर दरोडा घालून दीड लाख रुपये लुटल्याप्रकरणी पोलिसांना पांढरकवड्यातील कुख्यात लुटारू साजीद टोळीवर संशय आहे.

ट्रक दरोड्यात साजीद टोळीवर संशय
पांढरकवडा एसडीपीओ : तीन पथके रवाना, नागपुरात आश्रयाला असण्याचीही शक्यता
पांढरकवडा : राष्ट्रीय महामार्गावरील करंजी पुलानजीक ट्रकवर दरोडा घालून दीड लाख रुपये लुटल्याप्रकरणी पोलिसांना पांढरकवड्यातील कुख्यात लुटारू साजीद टोळीवर संशय आहे. पोलिसांनी या टोळीचे लोकेशन शोधण्यासाठी मोेर्चेबांधणी चालविली आहे.
उत्तरप्रदेशातून चेन्नईकडे जाणाऱ्या ट्रकवर गुरुवारी पहाटे करंजी उड्डाण पुलानजीक दरोडा घातला. चालकाला मारहाण करून ट्रकच्या कॅबिनमधील एक लाख ४० हजार रुपये लुटून नेण्यात आले. दोन महिन्यात लागोपाठ घडलेल्या दरोड्याच्या या घटनेने वडकी, पांढरकवडा आणि महामार्ग पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. दरोड्याच्या या घटनेत बोलेरो गाडीचा वापर झाल्याने पोलिसांना येथील गुंड शेख साजीद अब्दूल गफ्फार याच्या टोळीवर संशय बळावला आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी साजीद टोळीने वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुईगठाणींचा ट्रक लुटण्यासाठी त्याच्या चालकाचा निर्घृण खून केला होता. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने ट्रक लुटण्याचा प्रयत्न फसला. या घटनेत वापरलेल्या बोलेरो गाडीसह साजीद अद्याप फरार आहे. गुरुवारी पहाटे घडलेल्या ट्रकवरील दीड लाखांच्या दरोड्यातही साजीद टोळीचाच हात असावा, अशी दाट शक्यता पांढरकवडा येथील प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गिरी (वणी) यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. गिरी म्हणाले, साजीदवर दरोडा, वाटमारी सारखे गुन्हे दाखल आहेत. तो नागपुरातील अशा स्वरूपाच्या गुन्हेगारांकडे आश्रयाला आहे. त्यांच्याच मदतीने साजीदने ट्रक लुटीचा गुन्हा केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी साजीदवर तपास केंद्रीत केला आहे. आपण केव्हा ना केव्हा पोलिसांच्या हाती लागणारच त्यामुळे बाहेर आहे, तोपर्यंत गुन्हे करण्याची त्याची मानसिकता असू शकते. पोलिसांनी साजीद सोबतच रेकॉर्डवरील अन्य गुन्हेगारांवर तसेच नवख्या गुन्हेगारांचा यात सहभाग आहे काय या दृष्टीने लक्ष केंद्रीत केले असल्याचे गिरी यांनी स्पष्ट केले.
ट्रक लुटीच्या या गुन्हाचा तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्याकडे आहे. लुटारू नेमके चार होते की अधिक याबाबत फिर्यादीच संभ्रमात असल्याची माहिती माधव गिरी यांनी दिली. कारण फिर्यादीच्या भाषेची अडचण निर्माण झाली आहे. त्यांची भाषा समजणे कठीण आहे. शिवाय घटनेच्यावेळी पाऊस सुरू असल्याने आणि ते घाबरल्याने लुटारूंची नेमकी संख्या किंवा तोंड ओळख सांगणे त्यांना कठीण गेल्याचे गिरी यांनी सांगितले. दरम्यान ट्रक लुटीतील आरोपींच्या शोधार्थ पांढरकवडा पोलिसांनी आपली तीन पथके आदिलाबाद, नागपूर आणि वणीकडे रवाना केली आहे. (शहर प्रतिनिधी)
साजीदच्या घरांची झडती
पांढरकवड्यातील अट्टल गुन्हेगार साजीद याच्या पांढरकवडा व यवतमाळातील घराची वडकीचे ठाणेदार अमोल माळवे यांच्या पथकाने यापूर्वीच झडती घेतली आहे. ट्रक चालकाच्या खून प्रकरणात साजीदचे दोन साथीदार पोलिसांच्या हाती लागले. मात्र साजीदसह अन्य तिघे फरार आहे. वडकी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
अपर पोलीस अधीक्षक पांढरकवड्यात दाखल
जिल्ह्याचे प्रभारी एसपी तथा अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी शुक्रवारी पांढरकवडा येथे भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणीही केली. शिवाय तपासाबाबत पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.