शाळा-महाविद्यालयांना टवाळखोरांचा गराडा
By Admin | Updated: February 8, 2015 23:41 IST2015-02-08T23:41:18+5:302015-02-08T23:41:18+5:30
शहरातील शाळा-महाविद्यालयेही टवाळखोरांच्या गराड्यात सापडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गोधणी मार्गावर तर या टवाळखोरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. एवढेच नव्हे

शाळा-महाविद्यालयांना टवाळखोरांचा गराडा
यवतमाळ : शहरातील शाळा-महाविद्यालयेही टवाळखोरांच्या गराड्यात सापडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गोधणी मार्गावर तर या टवाळखोरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. एवढेच नव्हे तर शैक्षणिक संस्थांच्या आवारात शिरून हे टवाळखोर थेट मुलींची छेड काढत असल्याचे प्रकारही घडत आहे.
शहरातील दाते कॉलेज चौक ते जीवन प्राधिकरण कार्यालय आणि तेथून गोधणी मार्गावर विविध शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वर्दळ असते. सकाळपासूनच विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालयांमध्ये ये-जा असते. नेमक्या याच बाबीचा फायदा घेत या मार्गावर अनेक टवाळखोर सक्रिय झाले आहे. टोळक्या टोळक्याने हे महाविद्यालयासमोर आढळून येतात.
विद्यार्थिंनीची छेड काढणे, त्यांच्याशी अश्लिल हावभाव करणे, मोबाईलवर अश्लिल एसएमएस पाठविणे असे अनेक प्रकार या टवाळखोरांकडून केले जात आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थिंनी या दहशतीत असतात. आता तर या टवाळखोरांची मजल थेट महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या आवारात शिरून छेड काढण्यापर्यंत गेली आहे. अनेकदा ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षकांच्या हा प्रकार लक्षात येतो तेव्हा ते या टवाळखोरांना समज देण्याचा प्रयत्न करतात.
मात्र त्यांच्या अंगावरच हे टवाळखोर चालून जात असल्याने आता त्या भानगडीतही फारसे कुणी पडताना दिसत नाही. दुचाकीवरून घिरट्या घालणे, विद्यार्थिंनींना वाहनाव्दारे कट मारणे आदी प्रकार तर नित्याचे झाले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थिंनीच्या मनावर आणि अभ्यासावर होत आहे. पोलीस ठाणेस्तरावर चिडीमारी मोडीत काढण्यासाठी छेडछाड विरोधी पथक गठीत करण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून नियमित गस्त आणि या रोडरोमियोंना समज देण्याचे काम होत नसल्याने त्यांची मजल उत्तरोत्तर वाढतीच आहे.
ही टवाळखोरी नियंत्रीत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. ही टवाळखोरी नियंत्रीत न केल्यास आगामी काळात यातून गंभीर घटना घडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)