योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 14, 2015 02:53 IST2015-06-14T02:53:40+5:302015-06-14T02:53:40+5:30
जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.

योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
जिल्हाधिकारी : उणिवा दाखविण्याचे आवाहन
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर पत्रपरिषदेत सिंह यांनी पहिल्यांदा वार्तालाप केला.
जिल्ह्यात काम करताना प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या शिवाय अन्न सुरक्षा योजना, संजय गांधी योजना, विधवा व अपंगांच्या योजना यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येईल. या शिवाय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचाही लाभ देण्यात येईल. शासनाकडून सर्वसामान्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना व सोयी-सुविधांचा लाभ त्यांना कुठल्याही अडचणीशिवाय मिळावा या पद्धतीने काम करणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.
प्रशासनातील उणिवा काढण्यासाठी अनेक बाबी आहे. मात्र या उणिवा दूर करून त्याचा सर्वसामान्यांना कसा फायदा होईल, यासाठी सर्वांकडून सूचना अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. २१ जून रोजी जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ४ जुलै रोजी जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचा सर्वे करण्यात येईल. १०० कुटुंबामागे एक सर्वेअर त्यामध्ये ग्रामसेवक, अंगणवाडीताई, तलाठी यासारखे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. शाळाबाह्य मुलांना तत्काळ शाळेत दाखल करण्यात येणार आहे. या शिवाय कर्मचाऱ्यांचे मुख्यालयी न राहणे, अन्न सुरक्षा योजनेतील अपहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या दक्षता समित्यांचाही अहवाल घेण्यात येईल. या समित्या सक्रिय आहे त्यांनाच कायम ठेवले जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, यासाठी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा आढावा घेण्यात येत आहे. १५ जूनपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत कर्ज वाटपाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा बँकेकडे असलेले उद्दिष्ट सर्वाधिक होते. त्यांचा कर्जवाटपाचा भार कमी करून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये विभागून दिला आहे. सर्व बँक शाखेच्या कार्यक्षेत्रातील गावांची संख्या निश्चित केली आहे. त्याची माहिती जिल्ह्याच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)