आरक्षण वाचविण्यासाठी आदिवासी रस्त्यावर
By Admin | Updated: April 8, 2015 02:11 IST2015-04-08T02:11:02+5:302015-04-08T02:11:02+5:30
आदिवासी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढून शासकीय धोरणाविरोधात प्रचंड नारेबाजी केली.

आरक्षण वाचविण्यासाठी आदिवासी रस्त्यावर
यवतमाळ : आदिवासी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढून शासकीय धोरणाविरोधात प्रचंड नारेबाजी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव पुरके, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांंनी केले. येथील आझाद मैदानातून या मोर्चाला प्रारंभ झाला. मार्गावरील महात्मा फुले, बसस्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करण्यात आले. बसस्थानक चौकात काही काळ रस्ता रोकोही करण्यात आला. यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे सभेत रुपांतर झाले. यावेळी १५ जूनपासून धनगर आणि तत्सम् गैर आदिवासींनी जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवून खऱ्या आदिवासींच्या एक लाख ७० हजार नोकऱ्या हडपल्याचा आरोप केला.
या मोर्चात कोलाम समाज संघटना, पारधी समाज संघटना, आदिवासी युथ असोसिएशन, आदिवासी पीपल्स फेडरेशन, आदिवासी वुमेन फेडरेशन, स्टुटंड जिल्हा फेडरेशन, हलबा संघटना, आंध कर्मचारी संघटना, आदिवासी विद्यार्थी संघ, बिरसा ब्रिगेड, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, आदिवासी विकास परिषद, अनुसूचित जाती-जमाती संघटनांचा परिसंघ सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)