आदिवासींना ‘अच्छे दिन’ येणार
By Admin | Updated: December 10, 2014 23:03 IST2014-12-10T23:03:59+5:302014-12-10T23:03:59+5:30
आदिवासींना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा, पाणी, वीज, शिक्षण यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. केंद्रात ‘अच्छे दिन’ येईल की नाही हे सांगता येणार नाही. मात्र राज्यात आदिवासींसाठी नक्कीच

आदिवासींना ‘अच्छे दिन’ येणार
राज्यपालांची ग्वाही : आकोली बुद्रुक येथील नागरिकांसोबत संवाद
प्रवीण पिन्नमवार - आकोली बुद्रुक (पांढरकवडा )
आदिवासींना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा, पाणी, वीज, शिक्षण यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. केंद्रात ‘अच्छे दिन’ येईल की नाही हे सांगता येणार नाही. मात्र राज्यात आदिवासींसाठी नक्कीच ‘अच्छे दिन येईल’अशी ग्वाही महामहिम राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी दिली.
पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूरजवळील आकोली बुद्रुक येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत बुधवारी आयोजित ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव बोलत होते. यावेळी आमदार प्रा.राजू तोडसाम, राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमल सिंह, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, गाडगे महाराज मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील उपस्थित होते.
आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, कुमरन भीम, रामजी गोंड हे जल, जमीन, जंगल या आदिवासींच्या हक्कासाठी लढले. त्यांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. तथापि आदिवासींना त्यांचे हक्क मिळाले नाही. त्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. म्हणूनच आदिवासींचे हक्क, त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा, योजना कितपत देण्यात आल्या व सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व आदिवासी बांधवांना भेटण्यासाठी आलो आहे. यापुढील काळात आदिवासींच्या हक्कासाठी मी स्वत: राज्याचा राज्यपाल या नात्याने लढणार आहे, असे राज्यपाल म्हणाले.
लाखो डॉलरची ताकद आमच्या आदिवासी बांधवांमध्ये आहे. ती आपण ओळखली पाहीजे. स्वच्छ भारताच्या कामाची सुरूवात भारतात सर्वप्रथम गाडगे महाराजांनी केली. ते काम आपण सर्वांनी यापुढे सुरू ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी सकाळी ११.५० वाजता त्यांचे गोपालपूर जवळील आकोली बुदु्रक येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेत आगमन झाले. मुलींच्या लेझीम पथकाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास राज्यपालांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच दिवंगत राजाराम बापू घोंगटे सभागृहाचे उद्घाटन केले. यानंतर आश्रमशाळेतील प्रांगणात ‘विद्यार्थी संवाद‘ कार्यक्रम झाला.
प्रास्ताविक गाडगे महाराज आश्रमशाळेचे संचालक सचिन घोंगटे यांनी केले. तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतावर आदिवासी लोकनृत्य सादर केले. नंतर राज्यपालांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह राकेश नेमनवार, विजय पाटील चालबर्डीकर, नरसिंगराव सातुरवार, मुन्ना बोलेनवार, दिवाकर चौधरी, आकाश कनाके, अंकित नैताम, दिनेश सुरपाम, रामकृष्ण पाटील, नारायण भानारकर, मंगेश वारेकर व आकोली, गोपालपूर व परिसरातील ग्रामस्थ, आदिवासी बांधव व महिला उपस्थित होत्या. संचालन रवींद्र बावीसकर यांनी मानले.
निवेदनासाठी नागरिकांची गर्दी
आश्रमशाळा कार्यालयात राज्यपालांना निवेदन देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी नागरिकांनी अनेक निवेदन दिले. तसेच राज्यपालांना विविध विषयावर आपले म्हणणे व गाहाणे सांगितले.