आदिवासी समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:55 IST2018-12-15T23:54:05+5:302018-12-15T23:55:23+5:30
अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) इतर कोणत्याची जातींचा समावेश करू नये, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शनिवारी तालुक्यातील आदिवासी संघटना व समाज बांधवांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.

आदिवासी समाजाचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) इतर कोणत्याची जातींचा समावेश करू नये, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शनिवारी तालुक्यातील आदिवासी संघटना व समाज बांधवांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
येथील बिरसा मुंडा ब्रिगेड, आदिवासी कर्मचारी संघटना, आदिवासी विकास परिषद, आक्रोट संघटना, बिरसा क्रांती दल आदींच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा सुभाष चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, तहसील चौकमार्गे यशवंत रंगमंदिरावर पोहोचून तेथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. ‘एक तीर एक कमान-सर्व आदिवासी एक समान’ आदी घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आरक्षण आमच्या हक्काचं असल्याचे सांगितले. सभेत नेत्यांनी अनुसूचित जमातीमध्ये इतर कोणत्याही जातीच्या समावेशाला विरोध दर्शविला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गैरआदिवासीविरोधातील निकालाची कठोर अंमलबजावणीची मागणी केली.
डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करावी, आदिवासींना वनजमिनीचे पट्टे द्यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, डॉ.हरिभाऊ फुपाटे, संदेश पांडे, रमेश उमाटे, संतोष माघाडे, फकीरराव जुमनाके, वाघोजी खिल्लारे, दादाराव चिरंगे, डॉ.आरती फुपाटे, राजू देवतळे, नामदेव इंगळे, सुरेश धनवे, अनंत माळकर आदींच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात तालुक्यातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.