भावसार महिलांची वस्तूऐवजी वृक्ष भेट
By Admin | Updated: February 13, 2016 02:20 IST2016-02-13T02:20:29+5:302016-02-13T02:20:29+5:30
प्रदूषण नियंत्रणात यावे, महिलांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती व्हावी यासाठी भावसार महिला मंडळाने संक्रांतीनिमित्त महिलांना वाणात वस्तूऐवजी वृक्ष भेट दिले.

भावसार महिलांची वस्तूऐवजी वृक्ष भेट
नेर : प्रदूषण नियंत्रणात यावे, महिलांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती व्हावी यासाठी भावसार महिला मंडळाने संक्रांतीनिमित्त महिलांना वाणात वस्तूऐवजी वृक्ष भेट दिले. यासोबतच या मंडळाने आपले सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध केले.
भावसार महिला मंडळातर्फे येथील विठ्ठल मंदिरात हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. स्नेहमिलनाच्या या सोहळ्याला सामाजिक पदर जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित महिलांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. नगरपरिषदेतर्फे शहरात प्लास्टिक निर्मूलन अभियान राबविले जात आहे. या अभियानाला बळकटी देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. वृक्ष कापडी पिशवीत देण्यात आले. या मंडळातर्फे गतवर्षी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी खर्चात बचत करून पाच हजार रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांना दिला होता. याहीवर्षी त्याला साजेसा असा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेविका अॅड. रश्मी पेटकर, उपाध्यक्ष अलका नघाटे, सचिव स्मिता येळणे, महासचिव रेणुका गायकवाड यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)