ट्रेझर बोटने चालगणी घाटावर रेतीचे उत्खनन
By Admin | Updated: May 8, 2015 23:55 IST2015-05-08T23:55:27+5:302015-05-08T23:55:27+5:30
तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील चालगणी रेती घाटातून ट्रेझर बोटच्या सहाय्याने वाळूचा अमर्याद उपसा सुरू आहे.

ट्रेझर बोटने चालगणी घाटावर रेतीचे उत्खनन
वाळूचा उपसा : महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
अविनाश खंदारे उमरखेड
तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील चालगणी रेती घाटातून ट्रेझर बोटच्या सहाय्याने वाळूचा अमर्याद उपसा सुरू आहे. हा प्रकार खुलेआम सुरू असताना महसूल प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करीत नाही.
उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवर १८ रेती घाट आहे. त्यात तिवरंग, हातला, दिवट पिंपरी, पळशी, संगमचिंचोली, मार्लेगाव, तिवडी, चालगणी, साखरा, खरुस, देवसरी, चातारी, बोरी, सिंदगी, गाजेगाव, सावळेश्वर, बोरगाव आणि टाकळीबंदी घाटाचा समावेश आहे. यावर्षी केवळ चालगणी, सावळेश्वर, बोरी आणि हातला या रेती घाटाचे लिलाव झाले आहे. त्या ठिकाणाहून रेतीचा उपसा सुरू आहे. परंतु कोणतीही परवानगी नसताना चालगणी रेती घाटावर उपस्यासाठी ट्रेझर बोटचा वापर केला जात आहे. अमर्याद रेतीचा उपसा ट्रेझर बोटच्या सहाय्याने केला जात आहे. याबाबत परिसराचे मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ट्रेझर बोट चालू असून दररोज वाळूचा उपसा होत असल्याचा अहवाल उमरखेडचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिला आहे. परंतु अहवाल दिल्यानंतरही तहसीलदारांकडून कुठलीही कारवाई झाली नाही. एकीकडे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल रेती घाटावर जाऊन धाडी मारीत आहे. कठोर कारवाई करीत आहे. मात्र उमरखेड तहसीलदार चालगणी रेती घाटावरील ट्रेझर बोटसंदर्भात कोणतीही भूमिका घेत नसल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करीत आहे. ट्रेझर बोटने रेतीचा उपसा होत असल्यामुळे पैनगंगा नदीच्या पात्रात मोठमोठ्ठे खड्डे पडले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेले अवैध उत्खनन थांबविण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नाही.
लिलाव न झालेले घाटही गजबजले
उमरखेड तालुक्यातील १८ पैकी चार रेती घाटांचे लिलाव झाले आहे. उर्वरित १४ रेती घाटांचे लिलाव झाले नसताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. स्थानिक महसूल प्रशासनाच्या संगनमताने रेतीचा उपसा होत असल्याचा आरोप आहे.
फिरते पथक नावालाच
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रात होणाऱ्या अवैध रेती उपस्याला पायबंद घालण्यासाठी फिरते पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांचा समावेश आहे. परंतु या पथकाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. केवळ काही रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मराठवाड्यातील रेती तस्करांचा धुमाकूळ
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा विदर्भ आणि मराठवाड्याला विभागते. नदीच्या पात्रात मराठवाड्यातील रेती तस्कर खुलेआम शिरत असून या रेतीची वाहतूक केली जाते. मशीनच्या साहाय्याने ही मंडळी नदीतून रेती मराठवाड्यात नेऊन खुलेआम विकत आहे. उमरखेड महसूल प्रशासन मात्र त्यांच्यावर कारवाई करीत नाही.