ट्रॅव्हल्स विमानापेक्षा महाग
By Admin | Updated: November 2, 2015 01:48 IST2015-11-02T01:48:46+5:302015-11-02T01:48:46+5:30
विमानापेक्षाही ट्रॅव्हल्सचे दर महाग, ऐकून धक्का बसलायना. मात्र हे सत्य आहे. यवतमाळातून पुण्याला खासगी बसने जायचे असल्यास ३२०० रुपये मोजावे लागते.

ट्रॅव्हल्स विमानापेक्षा महाग
ट्रॅव्हल्सचे तिकीट ३२०० : नागपूर-मुंबई विमान प्रवास २५०० रुपये
रूपेश उत्तरवार यवतमाळ
विमानापेक्षाही ट्रॅव्हल्सचे दर महाग, ऐकून धक्का बसलायना. मात्र हे सत्य आहे. यवतमाळातून पुण्याला खासगी बसने जायचे असल्यास ३२०० रुपये मोजावे लागते. उलट नागपूरवरून मुंबईला विमानाने जाण्यासाठी केवळ २५०० रुपये लागतात. दिवाळी सणाच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांची अक्षरश: पिळवणूक चालविली आहे.
दिवाळीच्या पर्वात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कॅश करण्यासाठी ट्रॅव्हल्स मालकांनी आपल्या प्रवासी दरात एकपट-दुप्पट नव्हे तर पाच पट दर वाढविले आहे. साधारणत: यवतमाळ-पुणे खासगी बसचे नियमित दर ७०० ते ९०० रुपये असतात. मात्र सध्या दिवाळीची गर्दी लक्षात घेता ५ नोव्हेंबरपासून दर वाढविले जाणार आहे. पुण्याहून यवतमाळकडे दिवाळीपूर्वी येण्याचे दर आणि दिवाळीनंतर पुण्याला ज्याचे दर २५०० रुपये, तीन हजार रुपये ते ३२०० रुपयेपर्यंत पोहोचले आहे. त्यातही अॅडव्हॉन्स बुकिंग करावी लागत आहे. विशेष म्हणजे एसटी बसचे दर ९४० रुपयावरून ७४७ रुपये करण्यात आले आहे.
यवतमाळ शहरातून पुण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात बसेस सुटतात. नियमित प्रवासी मिळत असल्याने एसी आणि नॉन एसी बसेसची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या काळात पुण्याला शिक्षणासाठी असलेली यवतमाळातील मंडळी शहरात येतात. रेल्वेची सुविधा असतानाही अनेक जण ट्रॅव्हल्सनेच येणे पसंत करतात. त्यामुळे या १५ ते २० दिवसात प्रवाशांची संख्या दहापटीने वाढते. त्यामुळे वाहने कमी आणि प्रवासी जास्त अशी स्थिती निर्माण होते. याचाच फायदा घेत काही वर्षांपासून ट्रॅव्हल्स मालक दिवाळीच्या काळात तिकिटांचे दर वाढवितात. मात्र गत दोन वर्षांपासून हे दर विमानालाही लाजविणारे आहे. नागपूर ते मुंबई विमानाचे दर २५०० रुपये आहे. त्या तुलनेत कमी अंतर असलेल्या यवतमाळ ते पुणेसाठी ३२०० रुपये मोजावे लागत आहे. एवढे असतानाही प्रवाशांच्या मात्र यावर उड्या पडत आहे.
वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभागाची असते. मात्र खासगी ट्रॅव्हल्सचे दर किती असावे हे ठरविण्याचे अधिकार परिवहन विभागाला नसल्याचे सांगत त्यांनी हात वर केले. आरटीओंची नेमकी जबाबदारी काय हाच प्रश्न या आहे. तर या विरोधात कुणी तक्रार करायला पुढे येत नाही. निमूटपणे अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करताना दिसतात.
‘एसटी’ने केले पुण्याचे दर कमी, आरटीओचे हात वर
दिवाळीच्या काळात वाढती गर्दी पाहून ट्रॅव्हल्स मालकांनी पाचपट तिकीट दर वाढविले आहे. उलट राज्य परिवहन महामंडळाने नियमित ९४० रुपये असणारे तिकीट या काळात जादा बससाठी ७४७ रुपये केले आहे. जादा बसेस यवतमाळ, वणी, नेर, दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा आगारातून सोडण्यात येणार आहे.
खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दर किती असावे, ही बाब प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे या प्रकारात आरटीओ काहीही करू शकत नाही. प्रवाशांनीच अशा प्रकाराला लगाम घालावा.
- एस.एस.झोड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी