करंजीचा प्रवासी निवारा अतिक्रमणात
By Admin | Updated: November 1, 2015 02:51 IST2015-11-01T02:51:52+5:302015-11-01T02:51:52+5:30
तालुक्यातील उमरी (रोड) येथील एस.टी. महामंडळाचा प्रवासी निवारा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.

करंजीचा प्रवासी निवारा अतिक्रमणात
पांढरकवडा : तालुक्यातील उमरी (रोड) येथील एस.टी. महामंडळाचा प्रवासी निवारा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या प्रवासी निवाऱ्यावर खासगी हॉटेल आणि इतर व्यावसायिकांनी अवैध अतिक्रमण केले असून ते त्वरित हटवून प्रवासी निवारा मोकळा करावा, अशी मागणी उमरीवासीयांनी केली.
प्रवाशांच्या सोयीसाठी उमरी येथे एस.टी.महामंडळाचा प्रवासी निवारा आहे. मात्र या प्रवासी निवाऱ्यावरच अतिक्रमण करण्यात आले आहे. आता प्रवासी निवाराच दिसेनासा झाला आहे. त्यामुळे उन्हातान्हात बसची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना प्रवासी निवारा कुठे आहे, याचा शोध घ्यावा लागतो. एस.टी.महामंडळाचा हा प्रवासी निवारा प्रवाशांच्या सोयीसाठी असताना, त्यावर व्यावसायिक व इतर मंडळीनी अवैध अतिक्रमण केले आहे. त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.
विशेष म्हणजे उमरी येथे जलद वाहनांचा थांबा असल्यामुळे दररोज शेकडो बस येथे थांबतात. प्रवाशांना मात्र रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर आहे. मध्यंतरी येथील अतिक्रमण हटविण्यात आले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी अतिक्रमण ‘जैसे थे’ झाले व प्रवासी निवाराच तेथून गायब झाला. याबाबत संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांपासून तर परिवहन विभागाच्या सचिव व मंत्र्यापर्यंत गावकऱ्यांनी निवेदने पाठविला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उमरी येथील प्रवासी निवाऱ्यावर झालेले अतिक्रमण त्वरित हटवून हा प्रवासी निवारा प्रवाशांसाठी मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. (तालुका प्रतिनिधी)