ताबेदार मालक समजून ८९ एकरचे हस्तांतरण

By Admin | Updated: July 9, 2015 02:40 IST2015-07-09T02:40:12+5:302015-07-09T02:40:12+5:30

माहूरच्या दत्तशिखर संस्थानची ८९ एकर जमीन ताबेदारालाच मालक समजून महसूल प्रशासनाने हस्तांतरित केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Transferring 89 Acres Understanding the Owner Owner | ताबेदार मालक समजून ८९ एकरचे हस्तांतरण

ताबेदार मालक समजून ८९ एकरचे हस्तांतरण


यवतमाळ : माहूरच्या दत्तशिखर संस्थानची ८९ एकर जमीन ताबेदारालाच मालक समजून महसूल प्रशासनाने हस्तांतरित केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शासनाद्वारे नियुक्त समितीने केलेल्या चौकशीत ही बाब निष्पन्न झाली आहे. आता जिल्हाधिकारी या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात माहूर शिखर संस्थानची हजारो एकर जमीन आहे. या जमिनीवर अनेक ठिकाणी अतिक्रमण केले गेले आहे. दरम्यान, शासनाने देवस्थानांच्या जमिनींचा शोध घेवून त्या त्यांना परत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठिकठिकाणी या जमिनींच्या शोधार्थ समित्या स्थापन केल्या गेल्या. वणी तालुक्यात महसूल यंत्रणेच्या रामभरोसे कारभाराचा एक नमुना या समितीच्या निदर्शनास आला.
वणी तालुक्याच्या शिंदोला येथील सुमारे ८९ एकर जमीन ही खुशालगिर गुरू हरिनारायणगिर गोसावी व झित्रू हिरामण बोबडे यांच्या ताब्यात व वाहितीत होती. या जमिनीचा मूळ मालक दत्तशिखर संस्थान माहूर हे आहे.
असे असताना ही जमीन सिलिंग कायद्यान्वये अधिग्रहित करून वाटप करण्यात आली. गोसावी व बोबडे हे केवळ वाहितदार असताना त्यांना मालक दाखवून या जमिनीचे अधिग्रहण केले गेले. मुळात ही जमीन संस्थानच्या मालकीची आहे. २४ लाभार्थ्यांना ही जमीन वाटप करण्यात आली होती. १९६६-६७ च्या हक्क नोंदणीमध्ये हे रेकॉर्ड चौकशी समितीला सापडले आहे. या समितीमध्ये वणीचे उपविभागीय अधिकारी एल.एस. वऱ्हाडे, तहसीलदार अ.वि. मिसाळ, नायब तहसीलदार एम.बी. लामगे, अव्वल कारकून जे.एम. पाटील, कनिष्ठ लिपिक डब्ल्यू.व्ही. उमरीकर यांचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल २२ जुलै २०१३ ला जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. मात्र या प्रकरणात अद्यापही कोणतीच कारवाई केली गेलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे.
म्हणून दत्तशिखर संस्थान माहूरच्यावतीने गोपाल भारती (आर्णी) यांनी विभागीय महसूल आयुक्त आणि प्रधान सचिवांकडे दाद मागितली आहे. ही ८९ एकर जमीन संस्थानला परत मिळावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Transferring 89 Acres Understanding the Owner Owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.