रेल्वे दाखविते वाकुल्या
By Admin | Updated: November 18, 2014 23:03 IST2014-11-18T23:03:27+5:302014-11-18T23:03:27+5:30
झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव मुकुटबन व परिसरातील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे वाकुल्या दाखवित आहे. तेथे रेल्वे स्थानक असूनही कोणत्याच गाडीचा थांबा नसल्याने

रेल्वे दाखविते वाकुल्या
प्रवाशांची परवड : स्टेशन असूनही थांबा नाही, सर्वच उदासीन
वणी : झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव मुकुटबन व परिसरातील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे वाकुल्या दाखवित आहे. तेथे रेल्वे स्थानक असूनही कोणत्याच गाडीचा थांबा नसल्याने परिसरातील प्रवाशांचे हाल होत आहे.
आदिवासीबहुल झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन हे सर्वात मोठे गाव आहे़ तालुका ठिकाणापेक्षाही हे गाव मोठे आहे. तेथे दर सोमवारी मोठा आठवडीबाजार भरतो. परिसरातील ग्रामस्थ या बाजारात खरेदीसाठी येतात. व्यापारी व राजकीय दृष्टिकोनातूनही हे गाव महत्वाचे आहे़ या गावाजवळूनच रेल्वे लाईन गेली आहे. त्या रुळांवरून दररोज धडधड करीत नागपूर ते नांदेड ही रेल्वे जाते. मात्र ती तेथे थांबतच नाही. हा परिसर निसर्गरम्य आहे. आता औद्योगिक क्षेत्रही विस्तारत आहे. येत्या काही वर्षांत मोठा सिमेंट प्रकल्प तेथे उभा होत आहे.
या गावाला लागून सभोवताल ५० ते ६० च्यावर खेडी आहेत़ परिणामी हे गाव परिसरातील मुख्य गाव म्हणून ओळखले जाते. तेथूनच परिसरातील ग्रामस्थांना पुढील मार्गक्रमण करावे लागते. मात्र तेथे रेल्वे स्टेशन असूनही रेल्वेचा थांबा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. मुकुटबन येथून नंदीग्र्राम रेल्वे दररोज मुंबई व नागपूरकडे धावते. मात्र ही एक्सप्रेस तेथे थांबत नाही. ती परिसरातील ग्रामस्थांना वाकुल्या दाखवित पुढे निघून जाते. त्यामुळे या रल्वेने प्रवास करावयाचा असल्यास परिसरातील ग्रामस्थांना नागपूर किंवा मुंबईकडे जाण्यासाठी तेथून १२ किलोमीटर अंतरावरील कायर किंवा धानोरा येथील रेल्वे स्टेशन गाठावे लागते.
मुकुटबन स्टेशनवर रेल्वे थांबण्यासाठी काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात सुविधांची चाचपणी करण्यात आली. त्यावेळी रेल्वे थांबण्याचे संकेत मिळाले होते. मात्र ऐनवेळी माशी कुठे शिंकली, कुणास ठावूक, अद्याप तेथे कोणत्याही रेल्वेला थांबा मिळालाच नाही. परिणामी प्रवाशांना दुसऱ्या रेल्वे स्थानकावर जाऊन प्रवास करावा लागतो. त्याचा प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. सोबतच त्यांचा वेळही वाया जातो. रेल्वे स्थानक असूनही थांबा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)