तंटामुक्त मोहिमेसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा
By Admin | Updated: May 4, 2015 00:08 IST2015-05-04T00:08:23+5:302015-05-04T00:08:23+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेसंदर्भात बुधवारी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा पोलीस मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात आली.

तंटामुक्त मोहिमेसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा
मूल्यमापनाचे मार्गदर्शन : जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, ठाणेदार, विधी अधिकारी उपस्थित
यवतमाळ : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेसंदर्भात बुधवारी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा पोलीस मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात आली.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेसंदर्भात जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्यावतीने सदर मोहिमेत घोषित तंटामुक्त गावांचे मूल्यमापन कसे करावे, या बाबत यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील मूल्यमापन समित्यांचे सदस्य, सर्व तहसीलदार, ठाणेदार, विधी अधिकारी, पंचायत समिती सभापती व पत्रकार उपस्थित होते.
या कार्यशाळेला अपर पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे यांनी मार्गदर्शन करून जिल्ह्यात तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत घोषित तंटामुक्त गावांचे मूल्यमापन कसे करावे, मूल्यमापनात येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात व शासनाच्या निर्देशाप्रमाणे मूल्यमापन कसे करावे आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मूल्यमापनासंदर्भात सूचनांची माहिती पुस्तिका सर्वांना वितरित करण्यात आली.
मूल्यमापनाबाबत समितीतील सदस्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. १ ते ५ मे या कालावधीत सर्व घोषित
गावांचे जिल्ह्यांतर्गत मूल्यमापन होणार आहे. नागरिकांचे यामध्ये सहकार्य घेण्याच्या सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. प्रशिक्षण कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तंटामुक्त कक्षाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे, सहायक पोलीस निरीक्षक बहाकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नाझिम शेख, शेखर वांढरे व भारती जगताप यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)