शेतकरी नाईलाजाने व्यापाऱ्यांच्या दारी
By Admin | Updated: May 18, 2017 00:47 IST2017-05-18T00:47:49+5:302017-05-18T00:47:49+5:30
यंदा पावसाळा लवकर आहे, शेतीच्या मशागतीच्या कामांना अद्याप हात लागलेला नाही. शेतकरी गेल्या वर्षीच्या तुरी विकण्यासाठी बाजार समित्यांमध्ये मुक्कामी आहेत.

शेतकरी नाईलाजाने व्यापाऱ्यांच्या दारी
साडेतीन हजाराने तुरीची विक्री : बाजार समित्यांमध्ये आता मुक्कामाला वेळ नाही, शेतीच्या मशागतीची लगबग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यंदा पावसाळा लवकर आहे, शेतीच्या मशागतीच्या कामांना अद्याप हात लागलेला नाही. शेतकरी गेल्या वर्षीच्या तुरी विकण्यासाठी बाजार समित्यांमध्ये मुक्कामी आहेत. सरकार हमी भावाने तूर खरेदीचे आश्वासन देत असले तरी त्यासाठी असलेले खरेदी केंद्र आणि तेथील गती पाहता सरकारच्या प्रामाणिकपणाबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे. अखेर याच कारणावरुन शेतकऱ्यांनी नाईलाजाने व्यापाऱ्यांना अवघ्या साडेतीन हजार ते तीन हजार ८०० रुपये क्ंिवटल दराने तुरी विकणे सुरू केले आहे.
पुढील हंगामासाठी शेतीच्या मशागतीचे कामे करायची असल्याने बाजार समित्यांमध्ये तूर खरेदीच्या प्रतीक्षेत थांबायला वेळ कुणाकडे आहे, हा एका शेतकऱ्याचा बोलका प्रश्न आहे. आणखी काही दिवस शेतकऱ्यांनी मुक्काम केले तरी त्याच्या तुरीची खरेदी होईलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे भाजपा-सेना युती सरकारच्या कारभाराला कंटाळून अखेर व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात तुरी विकण्याचा निर्णय शेकडो शेतकऱ्यांना घ्यावा लागला आहे. हमी भावाने तूर खरेदीसाठी शासनाने धरून-बांधून उभ्या केलेल्या यंत्रणेत समन्वय व एकमताचा अभाव दिसतो. ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारुन नेण्याचा व शेतकरी, सरकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
आमदारांची नेमकी बांधिलकी कुणाशी ?
तुरीच्या प्रश्नावर शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सत्ताधारी मंडळी वेळ काढू घोषणा करीत आहे. विरोधी पक्षही फोटोछाप आंदोलन करीत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मतांवर आमदार मंडळी निवडून आली, त्यापैकी कुणीही तुरीच्या विषयावर आक्रमक भूमिका घेण्यास तयार नाही. सत्ताधारीच नव्हे तर विरोधी बाकावरील आमदारांचीही हीच स्थिती आहे. ते पाहता निवडून आलेली ही आमदार मंडळी सरकारची, पक्षाची की शेतकरी-जनतेची असा प्रश्न उपस्थित केला जातो.