हिवराच्या व्यापाऱ्याला पावणेदोन लाखांचा गंडा
By Admin | Updated: November 5, 2016 00:18 IST2016-11-05T00:18:11+5:302016-11-05T00:18:11+5:30
मोबाईल कॉल करून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस येत असतानाच महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील एका कृषी केंद्र व्यावसायिकाला दिल्ली

हिवराच्या व्यापाऱ्याला पावणेदोन लाखांचा गंडा
कर्जाचे आमीष : दिल्लीवरून मोबाईल कॉल
हिवरासंगम : मोबाईल कॉल करून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस येत असतानाच महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील एका कृषी केंद्र व्यावसायिकाला दिल्ली येथील ठगाने कर्जाचे आमिष देवून पावणेदोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास दिगांबर करमोडकर रा.हिवरासंगम असे फसविल्या गेलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. विलासच्या मोबाईलव १५ जुलै २०१५ रोजी एक कॉल आला. लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला कंपनीकडून चार टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. विलासने संबंधिताला नाव विचारले असता दीपनारायण अवस्थी असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दहा लाख रुपयांच्या कर्जाची मागणी विलास करमोडकर यांनी केली. त्यावर संबंधित व्यक्तीने यासाठी दहा टक्के रक्कम बँकेत भरावे लागेल, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विलासने २९ आॅगस्ट २०१५ रोजी एक लाख रुपयांचा धनादेश संबंधिताने दिलेल्या खात्यात वळता केला. मात्र कर्जप्रकरण पुढे सरकले नाही. विलास कर्जाची प्रतीक्षा करीत असताना २० सप्टेंबर रोजी पुन्हा कॉल आला. त्यावेळी कर्ज तत्काळ हवे असल्यास आठ टक्के रक्कम भरा, २४ तासात कर्ज मिळेल, असे सांगितले. यावेळी रवींद्रसिंग राजपुत असे संबंधित व्यक्तीने आपले नाव सांगितले. एक लाख रुपये दिल्यानंतर कर्जाच्या आशेने विलासने पुन्हा २३ सप्टेंबर २०१५ रोजी ८० हजार रुपयांचा धनादेश संबंधिताच्या खात्यात जमा केला.
मात्र यानंतर आलेल्या फोनवर चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येत असल्याचा अनुभव आला. आपली फसवणूक तर झाली नाही ना, अशी शंका येवू लागली. याबाबत त्यांनी विविध ठिकाणी चौकशी केली. परंतु उपयोग झाला नाही. अखेर विलास करमोरकर यांनी महागाव पोलीस ठाण्यात गुरुवारी धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यावरून महागाव पोलिसांनी दीपनारायण अवस्थीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)