प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर चाकूहल्ला
By Admin | Updated: August 21, 2015 02:48 IST2015-08-21T02:48:31+5:302015-08-21T02:48:31+5:30
ड्युटीवर जाणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना ...

प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर चाकूहल्ला
यवतमाळ : ड्युटीवर जाणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या तिघांनी डॉक्टरांच्या गळ्यावर चाकू लावून मौल्यवान वस्तू व मोबाईलची मागणी केली होती.
डॉ. भूषण सुनील डाहोळे (२२) असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. ते मंगळवारी रात्री ड्युटीवर जात होते. त्यावेळी व्हॉलिबॉल ग्राऊंडजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. एकाने भूषणच्या गळ्यावर चाकू लावून मोबाईल व मौल्यवान वस्तूची मागणी केली. यावेळी झालेल्या झटापटीत भूषणच्या गालावर चाकूने वार केला. दरम्यान कुणी तरी घटनास्थळाकडे येत असल्याची चाहूल लागताच या तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. हे तीनही आरोपी पल्सर गाडीने आले होते.
वैद्यकीय महाविद्यालय परिसरात सातत्याने लुटमारीच्या घटना घडत असून या घटनेने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
डॉक्टर संपावर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ४० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सुरक्षेच्या मुद्यावरून बुधवारपासून संप पुकारला आहे. विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी व्यक्त केला. या आंदोलनाला मार्ड संघटनेनेही बाहेरुन पाठिंबा दर्शविला आहे.