Toxic alcohol intoxicated in Pandharkawada | पांढरकवडा शहरात विषारी दारूचा शिरकाव
पांढरकवडा शहरात विषारी दारूचा शिरकाव

ठळक मुद्देखुलेआम विक्री । पोलिसांचे अवैध धंद्यावरील नियंत्रण सुटले, मद्यपींचा उपद्रव वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शहरात बनावट दारूचा शिरकाव झाला असून त्याची खुलेआम विक्री सुरू असल्याने मद्यपींचा जीव धोक्यात आला आहे. शहरात अनेक ठिकाणी गावठी दारूची जोमात विक्री सुरू असून ही दारू विषयुक्त असल्याचे सांगितले जाते.
गंभीर बाब म्हणजे पांढरकवडा पोलिसांचे अवैध धंद्यावरील नियंत्रण पूर्णत: सुटले असून अवैध व्यावसायिक सैराट झाले आहेत. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी अवैध दारूविक्री व मटक्यांचे अड्डे खुलेआमपणे सुरू असल्याने सामान्य नागरिकात कमालिचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी काही महिन्यांपूर्वी स्वत: मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन स्टींग ऑपरेशन केले होते. त्यानंतर काही प्रमाणात अवैध धंद्यांवर आळा बसला होता. मात्र पुन्हा एकदा अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले आहे.
शहरातील बसस्थानकासमोर आठवडी बाजार परिसरात, इंदिरानगर परिसरात खुलेआम गावठी दारू विकली जात आहे. दारू दुकाने उघडण्याची वेळ सकाळी १० वाजताची असताना मात्र शहरातील अनेक दुकाने पहाटे ५ वाजताच दारूविक्री सुरू करतात. त्यामुळे दुकानांसमोर मद्यपींची रिघ लागलेली असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मात्र त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली जात आहे.

येथे आहेत मटका अड्डे
पांढरकवडा शहरातील ओम टॉकीज, आठवडी बाजार, इंदिरानगर, स्टेट बँक चौक, इंदिरा चौक, बसस्थानकासमोर खुलेआम मटक्यांचे अड्डे सुरू आहेत. हे मटका अड्डे पोलिसांना दिसत नाही काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरालगतच्या हॉटेल तसेच ढाब्यांवरूनदेखील अवैधरित्या दारूची विक्री केली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Toxic alcohol intoxicated in Pandharkawada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.