टॉवर उभारणीत शासनाला कोट्यवधींचा फटका
By Admin | Updated: March 25, 2017 00:25 IST2017-03-25T00:25:15+5:302017-03-25T00:25:15+5:30
पावरग्रीडच्या टॉवर उभारणीत वहितीखालील जमीन अकृषक न करता खोदकाम सुरू आहे.

टॉवर उभारणीत शासनाला कोट्यवधींचा फटका
विना परवानगी कामे : पिकांचे नुकसान
महागाव : पावरग्रीडच्या टॉवर उभारणीत वहितीखालील जमीन अकृषक न करता खोदकाम सुरू आहे. एका टावर उभारणीत दोन गुंठे जमीन वापरात येत असून वापरात बदल होत असताना महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. तालुक्यात साधारणपणे शंभरच्या आसपास टॉवर उभारणीचे काम युद्धस्तरावर सुरू असून महसूल मात्र वसूल केला जात नाही.
शासनाचे काम असल्याचे सांगून शेतकऱ्यांना धमकाविले जाते. त्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात केल्या आहेत. चंद्रपूर ते परळी अशी पावरग्रीडच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. एका टॉवरसाठी दोनशे मिटर जमीनीचे क्षेत्र व्यापल्या जात असून बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची परवानगीसुद्धा घेण्यात आली नाही. उभ्या पिकातच मनमानी पद्धतीने टॉवरचे साहित्य अस्ताव्यस्त टाकले जात आहे. त्यामुळे पिकांसह जमीनीचे नुकसान होत आहे. तक्रारदार शेतकऱ्यांचे तोंड पाहून त्याला नुकसान भरपाई दिल्या गेल्याचे सांगितले जात आहे. पावरग्रीडचे डेप्टी मॅनेजर विनोद सुवर्णकार यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर काम शासनाचे असून या कामाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही.
टॉवर उभारणीत गिट्टी, रेती, मातीचा वापर होत आहे. यासाठी लागणाऱ्या गौण खनिजाची कुठेही रॉयल्टी भरण्यात आली नसल्याची माहीती तहसील कार्यालयाने दिली आहे. अकृषक न करता जमीनीत बद्दल केल्या जात असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली आहे. काम शासनाचे असो की खासगी शासनाचा महसुल बुडता कामा नये, कुणीही असो कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार एन. एल. इसाळकर यांनी सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)