तब्बल १० खुनातील मारेकरी मोकाटच

By Admin | Updated: June 24, 2015 00:05 IST2015-06-24T00:05:33+5:302015-06-24T00:05:33+5:30

गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात झालेल्या तब्बल दहा खुनांमधील आरोपी मोकाट आहेत.

A total of 10 murderers are killed | तब्बल १० खुनातील मारेकरी मोकाटच

तब्बल १० खुनातील मारेकरी मोकाटच

सुगावाही नाही : अपर अधीक्षक देणार तपासाला दिशा
यवतमाळ : गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात झालेल्या तब्बल दहा खुनांमधील आरोपी मोकाट आहेत. खून का झाला आणि कुणी केला हे शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आता या खुनांचा तपास करणाऱ्या पथकांना दिशा देण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.
जिल्ह्यात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. अनेकदा पोलीस तपासात गुन्हा उघडकीस आणण्याच्या अगदी जवळ असतात. नेमका त्याच वेळेस त्यांचा कुठेतरी बंदोबस्त लागतो किंवा दुसरी जबाबदारी दिली जाते. त्यामुळे त्यांची लिंक तुटते आणि तपास प्रलंबित पडतो. अशाच कारणांमुळे जिल्ह्यात तब्बल बारा खुनांचे तपास प्रलंबित पडले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी चाबी भरल्यानंतर दोन गुन्हे डिटेक्ट झाले. मात्र अद्यापही दहा खुनातील आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. दहा खून झाले, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, सर्व सोपस्कार झाले, मात्र आरोपी नेमका कोण आणि खून कोणत्या कारणावरून केला हे पोलिसांना शोधता आलेले नाही. वडगाव रोड, यवतमाळ शहर, महागाव, शिरपूर, कळंब, पुसद शहर, आर्णी, लाडखेड, यवतमाळ ग्रामीण या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या या घटना आहेत. महागाव तालुक्यात दोन खून असून त्यातील एक घटना तर सन २०१३ पासूनची आहे. अन्य घटनाही सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झालेल्या आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी खुनाच्या या फाईली पुन्हा उघडल्या आहेत. तपास पथकांना या डिटेक्शनसाठी अवधी निश्चित करून दिला आहे. वरिष्ठांच्या अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून तपास पथकांना डिटेक्शनच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याची, दिशा दाखविण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडेही खुनासह अन्य काही गुन्ह्यांच्या समांतर तपासाची जबाबदारी आहे. त्यात आता संबंधित पोलीस ठाण्याची यंत्रणा यशस्वी होते की, स्थानिक गुन्हे शाखा आपली डिटेक्शनमधील कामगिरी दाखविते याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

पुजाऱ्याच्या खुनाचे तार ठाणे जिल्ह्यात
लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोखी येथील मंदिराच्या पुजाऱ्याचा सुमारे सहा महिन्यांपूर्वी खून करण्यात आला होता. खून नेमका कोणत्या कारणावरून झाला हे स्पष्ट नाही. मात्र पोलिसांनी पुजाऱ्याच्या या खुनावर लक्ष केंद्रीत केले आहे. तपास पथकाला त्याचे धागेदोरे ठाणे जिल्ह्यात गवसल्याची माहिती आहे. या अनुषंगाने एक पथक लवकरच संशयितांच्या शोधार्थ ठाण्याला जाणार असल्याचे पोलीस वर्तुळातून कळते.

Web Title: A total of 10 murderers are killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.