उधार दारूड्यांवर अघोरी प्रकार
By Admin | Updated: November 8, 2015 02:34 IST2015-11-08T02:34:44+5:302015-11-08T02:34:44+5:30
तालुक्यातील खोलापुरी उमरठा परिसरात विषारी दारूची विक्री होत आहे. मद्यपी व त्यांच्या परिवारात धास्तीचे वातावरण पसरत आहे.

उधार दारूड्यांवर अघोरी प्रकार
विषारी दारू : उमरठा सरपंचाने पोलिसांना दिली माहिती
नेर : तालुक्यातील खोलापुरी उमरठा परिसरात विषारी दारूची विक्री होत आहे. मद्यपी व त्यांच्या परिवारात धास्तीचे वातावरण पसरत आहे. या विषारी दारूचे धागे दारव्हा तालुक्यातील तरनोळी येथे जुळले असून मद्यपी पुन्हा दारू पिण्यासाठी येऊच नये, यासाठी हा अघोरी प्रकार केला जात आहे. यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.
नेर तालुक्यातील खोलापुरी, अडगाव या परिसरात गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उमरठा गावात ग्रामपंचायतीतर्फे दारूबंदीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे या गावातील मद्यपि खोलापुरी येथे दारू पिण्याकरिता जातात. खोलापुरी येथे तरनोळी येथून दारू आणली जाते. सदर दारूमध्ये विष प्रयोग होत असल्याची तक्रार मद्यपिंनी उमरठाच्या सरपंचांकडे केली आहे. सदर दारू प्राशन केल्यानंतर मद्यपि १२ तास झोपून राहतो. नंतर जागा झाल्यावर त्याला उलट्या होतात. अशा अवस्थेत त्याला रुग्णालयापर्यंत नेले जाते. अशा रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. या प्रकाराने मद्यपी व त्यांच्या परिवारात भीतीचे वातावरण आहे.
जेव्हा मद्यपीला दारूची आठवण येते, तेव्हा त्याचा रोजच्या पिण्याचा कोटा ठरलेला असतो. उमरठा येथे दारूबंदी असल्याने शेकडो मद्यपी खोलापुरीला जातात. सुरुवातीला तो नगदी पैसे देतो, मात्र नंतर उधारी सुरू होते. अशा उधार मागणाऱ्या ग्राहकांना विषाची दारू देण्यात येते. उधार मागणारा मद्यपी दुसऱ्यांदा येऊच नये, यासाठी दारू व्यावसायिकांनी हा अघोरी प्रकार सुरू केला आहे. एका दारू विक्रेत्यानेच नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. गावठी दारू तयार करताना त्यात मोहाफुल, गुळ, तुरटीचा तथा कुत्ता पावडरचा वापर करण्यात येतो. मात्र विषाच्या दारूत विषाचा प्रयोग जास्त होतो. यात झोपेच्या गोळ्या, बॅटरी सेलचा वापर होतो. त्यामुळे दारूमध्ये विषाचा अंश तयार होतो. (तालुका प्रतिनिधी)