शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी सुरूच राहणार
By Admin | Updated: March 2, 2017 00:48 IST2017-03-02T00:48:08+5:302017-03-02T00:48:08+5:30
शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याची तूर शासकीय

शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी सुरूच राहणार
जिल्हाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना ग्वाही : पाच लाख क्विंटल वाढीव खरेदीचा प्रस्ताव, घरूनच मिळणार टोकन
यवतमाळ : शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याची तूर शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी होणार आहे. त्यासाठी घरूनच अथवा बाजार समितीत पोहोचून टोकन पद्धतीने नाव नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समित्यांना दिले. बाजार समिती सभापतींच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा क्रमांक असेल, त्याच दिवशी शेतकऱ्यांनी केंद्रावर येण्याच्या सूचना जिल्ह्यातील बाजार समितींना देण्यात आल्या आहे. १५ मार्चनंतर केंद्र बंद होतील, या भीतीने शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. हे केंद्र शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये, खुल्या बाजारात पडलेल्या दरात तूर विकू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी बाजार समितीच्या सभापतींमार्फत शेतकऱ्यांना केले. त्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी सभापतींना दिली.
सध्या बाभूळगाव, कळंब, आर्णी, राळेगाव आणि घाटंजी येथील खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले. शेतकऱ्यांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समितीच्या सभापतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्य शासनाच्या धोरणांची माहिती त्यांना दिली. शेतकऱ्यांनी शासकीय तूर खरेदी केंद्रावरच तूर विकावी. याकरिता शेतकऱ्यांनी बाजार समितीत आपले नाव नोंदवावे आणि टोकन पद्धतीने क्रमांक लावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक बाजार समितींचे सभापती, संचालक उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
लाल, पांढरा दाणा भेद नको
शासकीय तूर खरेदी केंद्रांवर लाल आणि पांढरा दाणा, असा भेद होत आहे. हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी असा भेदाभेद न करता तूर खरेदी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बैठकीत दिली. यासोबतच निर्यात धोरण व आयात होणाऱ्या तुरीवरून हटविण्यात आलेल्या करावर निर्णय होणार आहे. यातून मोठे फेरबदल होतील. त्यामुळे तुरीचे भाव वाढतील, अशी माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी घाई न करता तुर विकण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.