कलावंतांच्या उदरनिर्वाहाचाही ‘सूर’ बिघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:07+5:30

बँड पथक, सनई चौघडे आणि आता अलीकडेच लग्न सोहळ्यात सुरू झालेली संगीत मैफल सादर करणाऱ्या कलाकारांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवघे तीन महिने त्यांच्यासाठी कमाईचे असतात. उर्वरित काळात मिळाले तर ते बोनस ठरते. बँड पथकाचे साहित्य खितपत पडून आहे. संगीतमय ऑर्केस्ट्रा संचालकांच्या भांड्यांनी अडगळीत जागा घेतली आहे.

The 'tone' of the artist's livelihood also deteriorated | कलावंतांच्या उदरनिर्वाहाचाही ‘सूर’ बिघडला

कलावंतांच्या उदरनिर्वाहाचाही ‘सूर’ बिघडला

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे वाद्यवृंदांपुढे प्रश्न, कार्यप्रसंगाला लागले ब्रेक, यावर्षीचा सिझनही गेला

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. विवाह सोहळे, कार्यप्रसंग, धार्मिक विधी यामुळे थांबले. ऐन सिझनमध्ये या कार्यक्रमांना लागलेला ब्रेक कलावंतांसाठी उपासमारीचा ठरत आहे.
बँड पथक, सनई चौघडे आणि आता अलीकडेच लग्न सोहळ्यात सुरू झालेली संगीत मैफल सादर करणाऱ्या कलाकारांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवघे तीन महिने त्यांच्यासाठी कमाईचे असतात. उर्वरित काळात मिळाले तर ते बोनस ठरते. बँड पथकाचे साहित्य खितपत पडून आहे. संगीतमय ऑर्केस्ट्रा संचालकांच्या भांड्यांनी अडगळीत जागा घेतली आहे. सिनेगीत, भक्तीगीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासोबतच तालासुरात मंगलाष्टक सादर करणाऱ्या या मंडळींची आज आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. लग्न कार्याचा सिझन केवळ तीन महिन्यांचा असतो. पुढील काळातही काम मिळणार नसल्याने त्यांचे वर्षभराचे नियोजन कोलमडणार आहे. अनेक कलावंतांनी वाद्य खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव केली आहे. याची परतफेड करणेही आवश्यक आहे. मात्र काम नसल्याने हा तिढा सोडवायचा कसा हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. सूरमयी संगीत संचाचे संचालक गौतम पाढेण यांनी आपली व्यथा मांडली. घरी शेती नाही, वाद्यवृंदाला काम नाही. त्यामुळे वर्षभराचा गाडा हाकायचा कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

द्रोण, पत्रावळी व्यावसायिक अडचणीत
कार्यप्रसंगी आजही ग्रामीण भागात पानापासून तयार केलेल्या द्रोण, पत्रावळींचा वापर केला जातो. या वस्तू तयार करणारी मंडळी ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आहे. मात्र यावर्षी कार्यप्रसंगच नसल्याने द्रोण आणि पत्रावळींना मागणी नाही. पर्यायाने या वस्तू तयार करणाऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे.

विविध व्यावसायिकांचा कोंडमारा
कार्यप्रसंगासाठी वापरले जाणारे विविध साहित्य पुरविणाऱ्यांचाही कोंडमारा झाला आहे. बिछायत केंद्र, स्टेज डेकोरेशन, कॅटरिंग, फोटोग्राफर, आचारी या व्यावसायिकांना गेली महिनाभरापासून काम नाही. मिळालेल्या ऑर्डरही संचारबंदीमुळे रद्द करण्यात आल्या. पुढील आणखी काही दिवस या लोकांना काम मिळणार नाही हे निश्चित आहे. बिछायत केंद्र, स्टेज डेकोरेशन या लोकांचा व्यवसाय सिझनेबलच असतो. इतर काळात अपवादानेच कामे मिळतात. या साहित्याचा पुरवठा करणाऱ्या लोकांसोबतच इतर छोटी-मोठी कामे करणाºयांनाही आधार मिळतो. साहित्याची वाहतूक करणारे, कॅटरिंगमध्ये असलेले साथीदार, फुल व्यावसायिक यांच्याही रोजगाराचा प्रश्न कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाला आहे.

Web Title: The 'tone' of the artist's livelihood also deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.