मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:22 IST2018-07-18T22:22:06+5:302018-07-18T22:22:20+5:30
मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या सहचारिणी मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळात आदरांजली सभेचे आयोजन स्थानिक प्रेरणास्थळ येथील मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या समाधीस्थळी करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता नगरपरिषद शाळांमधील वर्ग १ ते ५ च्या सर्व एक हजार २०० विद्यार्थ्यांना जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे. मातोश्री दर्डा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे एडिटर-इन-चीफ तथा राज्याचे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरीताई आडे, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, नगरपरिषद शिक्षण सभापती नीता केळापुरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिलकुमार अढागळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, नगरपरिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळात मातोश्री दर्डा सभागृहात वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त भजन व भावगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अमोलकचंद महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख तथा प्रसिद्ध गायक प्रा.डॉ.राहुल एकबोटे आणि त्यांचा संच गीत गायन करतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व लोकमत परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.