कृषिमंत्र्यांच्या निषेधासाठी आज ‘विजस’चे आंदोलन
By Admin | Updated: May 10, 2015 01:47 IST2015-05-10T01:47:20+5:302015-05-10T01:47:20+5:30
आदिवासी शेतकरी आत्महत्या करीत नसल्याचा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचा दावा खोटा आहे.

कृषिमंत्र्यांच्या निषेधासाठी आज ‘विजस’चे आंदोलन
यवतमाळ : आदिवासी शेतकरी आत्महत्या करीत नसल्याचा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचा दावा खोटा आहे. दरम्यान कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या सरकार शेतकरी आत्महत्या रोखू शकत नाही, या विधानाचा रविवार १० मे रोजी पांढरकवडा येथे निषेध केला जाईल, असे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कळविले आहे.
आदिवासी शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या भाजप-सेनेला दिसत नसतील तर त्यांनी दडपापूरच्या भोतू मेश्राम, रुंझाचा मधुकर पेंदोर, जोगीनकवडाचा रमेश घोडाम, बोरगावचा तानबा तोडसाम, जळकाचा अशोक कोहचाडे यांच्या घरी येवून त्यांच्या आत्महत्यांची कारणे विचारावी. प्रत्यक्ष भेटीतच त्यांना आदिवासी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे कळतील, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
विदर्भात मागील दशकात झालेल्या ११ हजारावर शेतकरी आत्महत्यांमध्ये ५० टक्के शेतकरी आदिवासी, दलित आणि भटक्या जमातीचे आहेत. बँकांनी कर्ज नाकारल्याने, कृषी मालाला भाव न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा सरकारी अहवाल आहे. असे असतानाही कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी खोटी माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. सरकारला शेतकरी आत्महत्या थांबविता येत नसेल तर मंत्रीपदाचा राजीनामा तत्काळ द्यावा, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, १० मे रोजीच्या निषेध कार्यक्रमात आदिवासी शेतकरी विधवा मोठ्या प्रमाणात सहभागी होतील, अशी माहिती सुनीता पेंदोर, सविता सिडाम व चंद्रकला मेश्राम यांनी कळविली आहे. (वार्ताहर)