आज मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा
By Admin | Updated: September 25, 2016 02:49 IST2016-09-25T02:49:36+5:302016-09-25T02:49:36+5:30
राज्यभर सुरू असलेला मराठ्यांचा झंझावात रविवारी यवतमाळात धडकणार आहे.

आज मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा
तीन लाखांच्या गर्दीचा पोलिसांचा अंदाज
यवतमाळ : राज्यभर सुरू असलेला मराठ्यांचा झंझावात रविवारी यवतमाळात धडकणार आहे. मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चासाठी यवतमाळ सज्ज झाले असून दुपारी १२ वाजता पोस्टल ग्राऊंड (समता मैदान) येथून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. लाखो समाजबांधवांची उपस्थिती राहणार असल्याने या मोर्चाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून या मोर्चाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अॅट्रोसिटीमधील बदल, मराठा समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी मराठा-कुणबी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजतापासून पोस्टल मैदानावर मोर्चेकऱ्यांना प्रवेश करता येणार आहे. पोस्टल ग्राऊंडमध्ये पुरुष, महिला असे स्वतंत्र कक्ष राहणार आहे. येथे चार वैद्यकीय पथकही राहतील.
पोस्टल मैदानावर उभारलेल्या स्टेजवर दहा युवती राहतील. येथे सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेतली जाईल. उरी हल्ल्यातील शहीद आणि देशभरात अत्याचाराने प्राण गमवावा लागलेल्या तरुणींना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर प्रा.प्रवीण देशमुख यांचे व्याख्यान होणार आहे. संचालन कैलास राऊत करतील. मोर्चाला प्रारंभ होईल तेव्हा सुरुवातीला युवती, त्यामागे महिला, युवक आणि इतर समाज असा क्रम राहणार आहे. आठच्या संख्येने मोर्चेकरी मार्गक्रमण करतील. दोन हजार स्वयंसेवकांचे त्याला संरक्षण राहील. तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
मोर्चाचा समारोप एलआयसी चौकात होणार असून त्या ठिकाणी स्वतंत्र स्टेज उभारण्यात आला आहे. समारोपीय कार्यक्रम १२ मिनिटांचा असून तेथून काही युवती मार्गदर्शन करतील, तर त्याचवेळात काही युवती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता होणार आहे. १२ अॅम्ब्युलन्स, चार ध्वनिक्षेपक रिक्षा आणि १०० ध्वनिक्षेपक या मोर्चात राहणार आहे. त्यावरून मोर्चेकऱ्यांना सूचना दिल्या जातील. (शहर वार्ताहर)
एक लाख झेंडे
मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चात सहभागी नागरिकांच्या हातात भगवे ध्वज राहणार आहे. सुमारे एक लाख ध्वज या मोर्चेकऱ्यांच्या हाती राहणार असून ५० हजार फलक घेतलेले नागरिक सहभागी होतील.
तगडा पोलीस बंदोबस्त
मराठा-कुणबी समाज मोर्चामध्ये तीन लाखांची किमान गर्दी होण्याचा अंदाज बांधून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.