कालमर्यादेत कामे व्हावी

By Admin | Updated: August 28, 2015 02:37 IST2015-08-28T02:37:21+5:302015-08-28T02:37:21+5:30

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी बेंबळा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा, यासाठी सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.

Time to work | कालमर्यादेत कामे व्हावी

कालमर्यादेत कामे व्हावी

बेंबळा प्रकल्प : अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा
के.एस. वर्मा  राळेगाव
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी बेंबळा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा, यासाठी सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाला झालेला विलंब, मुख्य कालवे, उपकालवे बांधण्यात झालेल्या चुका, गैरप्रकार यातील दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याचीही आवश्यकता आहे. आतापर्यंत झालेल्या खर्चाची आॅडिट करावे, अशीही मागणी होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवारच्या जिल्हा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या या अपेक्षांची दखल घेतल्या जावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. ७५ टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे काम पुढील तीन वर्षात वेगाने पूर्ण करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे. बेंबळा धरण पाच वर्षापूर्वीच पूर्ण झाले. कालव्याची कामे ८० टक्के पूर्ण झाली असल्याचा या विभागाचा दावा आहे. त्यामुळे उर्वरित कामे लवकर पूर्ण व्हावी. बेंबळा प्रकल्पामुळे राळेगाव, कळंब, बाभूळगाव, मारेगाव या चार तालुक्यातील १७७ गावांतील १९ हजार शेतकऱ्यांचे ५३ हजार हेक्टर सिंचनाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यातील ७५ टक्के प्रत्यक्षात साध्य होऊन किमान ४० हजार हेक्टर क्षेत्रात तरी ओलित होईल, अशी अपेक्षा होती. आज पाच वर्षानंतरही पाच-सहा हजार हेक्टर क्षेत्रात सिंचन पूर्ण क्षमतेने होत नाही.
८० च्या दशकात कै.शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाची कोनशीला बसविण्यात आली होती. ३५ पेक्षा अधिक वर्षे होवूनही प्रकल्प रखडलेला आहे. त्यावेळी केवळ ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता दोन हजार २०० कोटी रुपये खर्च होऊनही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होवू शकला नाही. अधिकारी, राजकारणी, ठेकेदार मात्र मालामाल झाले. शेतकऱ्यांची मात्र तिसरी पिढीही लाभाच्या प्रतीक्षेतच आहे.
उपवितरिका शेतकऱ्यांच्या जीवावर
धरणापासून सात किलोमीटर अंतरावर मुख्य कालव्याच्या भिंतीचे सिमेंट काँक्रीटचे काम झालेले नाही. मुख्य कालव्यात अनेक ठिकाणी मातीचे, मुरूमाचे ढिगारे आहेत. काही ठिकाणी वृक्ष आहेत. उजव्या कालव्याची लांबी ११३ कि़मी. आहे. त्यात ४३ कि़मी.पर्यंत कामे पूर्ण झाली असल्याचे व ५० कि़मी. लांबीपर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचते, असा दावा विभागाचा आहे. मात्र वरील अडथळ्यामुळे या दाव्यावर प्रश्नचिन्ह आहे. कोपरा जानकर या गावाचे नागरिक ओलसरपणामुळे जीव मुठीत धरून जगत आहे. कळंब तालुक्यातील आष्टी वितरिका, राळेगाव तालुक्यातील सावरगाव-आष्टा उपवितरिकेच्या बोगस कामामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी पाझरत आहे. तेथील शेती पडिक राहते. लांब अंतरांपर्यंत पाणीच पोहोतच नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. त्याबाबत निश्चित धोरण ठरवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

Web Title: Time to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.