पाणीटंचाईच्या उपाययोजना वेळीच करा
By Admin | Updated: November 7, 2015 02:47 IST2015-11-07T02:47:05+5:302015-11-07T02:47:05+5:30
आगामी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करावा तसेच पाणीटंचाईच्या उपाययोजना वेळीच करण्याचे निर्देश आमदार मनोहरराव नाईक यांनी येथे दिले.

पाणीटंचाईच्या उपाययोजना वेळीच करा
मनोहरराव नाईक : अधिकाऱ्यांना निर्देश, पुसद येथे टंचाई कृती आराखडा आढावा बैठक
पुसद : आगामी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करावा तसेच पाणीटंचाईच्या उपाययोजना वेळीच करण्याचे निर्देश आमदार मनोहरराव नाईक यांनी येथे दिले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाई आढावा सभा गुरूवारी घेण्यात आली. या सभेत आ. मनोहरराव नाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे होत्या. सभेला सभापती भगवान कांबळे, उपसभापती विवेक मस्के, जिल्हा परिषद सदस्य वर्षा पाटील, माधवी पाटील, व्दारका पारध, अरुण कळंबे, रमेश इंगळे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, कार्यकारी अभियंता भुजाडे, उपअभियंता काळबांडे उपस्थित होते. आमदार नाईकांच्या उपस्थितीत ही सभा तब्बल सात तास चालली.
पुसद तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीतील नागरिकांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. यासाठी अधिकारीस्तरावर वेळीच उपाय योजना करा, पाणीटंचाईसाठी आलेल्या निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे असे आमदार नाईक यांनी सांगितले. या बैठकीत सात जिल्हा परिषद सर्कलमधील गाव, तांडे, वाड्या येथील पाणीटंचाईबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. माळ पठारावर जीवन प्राधिकरण योजना सुरू आहे. परंतु सर्व गावांना पाणीपुरवठा होत नाही. अनेक गावात वीज नियमित राहात नाही. त्यामुळे शेतीच्या सिंचनावर विपरित परिणाम होत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीशी चर्चा करून शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा करण्याबाबत सूचना देण्याचे सांगण्यात आले.
या बैठकीत ग्रामसेवक सरपंचानाही समस्या मांडण्याची संधी देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षांचे सर्कल बेलोरा अंतर्गत वसंतवाडी, मोख, जवळी, पिंपळगाव, फेट्रा, बेलोरा याठिकाणी पाणीसमस्या नेहमीच असते. यावर कायमस्वरुपी उपाय योजना कशी करता येईल यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)