सातत्यपूर्ण मूल्यमापनाचेच ‘मूल्यमापन’ करण्याची वेळ
By Admin | Updated: November 22, 2014 23:09 IST2014-11-22T23:09:54+5:302014-11-22T23:09:54+5:30
मोठा गाजावाजा करत राज्यभर सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र क्रांती झाली. परीक्षेच्या जोखडामधून अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेने

सातत्यपूर्ण मूल्यमापनाचेच ‘मूल्यमापन’ करण्याची वेळ
चंद्रकांत ठेंगे - पुसद
मोठा गाजावाजा करत राज्यभर सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र क्रांती झाली. परीक्षेच्या जोखडामधून अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेने मोकळा श्वास घेतला. परंतु सद्यस्थितीत अनुधावन कार्यक्रमाचा पत्ताच नाही. त्यामुळे सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
अंमलबजावणीनंतर कोणतीही योजना यशस्वी आहे किंवा नाही याकरिता अनुधावन कार्यक्रम राबविला जातो. परंतु त्यादृष्टीने शिक्षण विभागाची हालचाल नसल्याचे दिसून येते. परीक्षा नाही, आठवीपर्यंत कुणी नापास नाही, त्यामुळे अभ्यास करण्याची आवश्यकताच नसल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे सरकारी व अनुदानित शाळांच्या पालकांमध्ये या पद्धतीबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. अद्याप काही शिक्षकांनाही ही योजना पूर्णपणे समजल्याची शास्वती देता येणार नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या नावाने बोंब मारण्याची वेळ आली आहे.
कोणताही शिक्षण प्रयोग दीर्घकालीन असतो. परंतु ताबडतोब रिझल्टच्या जमान्यात संयमित मानसिकता पालकांकडे उरलेली नाही. त्यामुळे खासगी शाळा आणि इंग्रजी शाळांकडे मुलांचा ओढा वाढला आहे. सरकारी शाळा ओस पडत असल्याचे मुख्य कारण हेच आहे. सरकारी शाळा सोडल्या तर खासगी आणि इंग्रजी शाळांमध्ये सर्रास घटक चाचण्या, सत्र परीक्षा घेतल्या जात आहे. दुसरीकडे शिक्षक कृत्रित नोंदी घेण्यातच व्यस्त आहे तर विद्यार्थी मात्र मस्त आहे. परिणामी पालक चिंताग्रस्त असल्याचे चित्र सर्वत्र आहे.
कोणत्याही योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनावर मोठी भिस्त असते. परंतु शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचे गुणवत्ता वाढीकडे लक्ष असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पद्धतीबाबत पुनर्विचार करावा, याबाबत आग्रही मागणी समोर येत आहे. मात्र याकडे शिक्षण तज्ज्ञांचे लक्ष दिसत नाही. केवळ आदेश आहे ना, मग तेवढेच करा, असा सूर असतो.