फुलसावंगी येथे तणावपूर्ण शांतता
By Admin | Updated: March 2, 2017 00:56 IST2017-03-02T00:56:44+5:302017-03-02T00:56:44+5:30
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे कृषी केंद्र संचालकांना मारहाण करून जवळपास नऊ लाख रुपयांची

फुलसावंगी येथे तणावपूर्ण शांतता
बाजारपेठ बंद : आरोपीच्या अटकेसाठी शुक्रवारचा ‘अल्टीमेटम’
फुलसावंगी : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे कृषी केंद्र संचालकांना मारहाण करून जवळपास नऊ लाख रुपयांची रोकड चार ते पाच आरोपींनी लुटून नेली. याप्रकरणी गावात तीव्र रोष असून, सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करावी, यासाठी फुलसावंगी येथे व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे. शुक्रवारपर्यंत पोलिसांना नागरिकांनी अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान महागाव येथे घटनेच्या दुसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता असून, महागाव पोलिसांसह दंगल नियंत्रक पथक गावात तळ ठोकून आहे.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील कृषी केंद्र चालकाला खंडणीसाठी धमकावून त्यानंतर सशस्त्र हल्ला करून लुटले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव पोलिसांच्या मदतीने तातडीने दोन आरोपींना मंगळवारीच अटक केली आहे. यामध्ये यवतमाळच्या चमेडियानगरातील कुख्यात मोबीनचा सहभाग असल्याचे तपासून पुढे आले आहे. पोलिसांनी निंगनूर शिवारात शोध घेतला असता फुलसावंगीतील विधीसंघर्षग्रस्त बालक आणि यवतमाळच्या चमेडियानगरातील मोबीन शेख इसराईल (२७) हा कुख्यात आरोपी पोलिसांच्या हाती लागला.
इतर दोन आरोपी पसार झाले. या दोघांकडून लुटीचा मुद्देमाल मिळाला नाही. उर्वरित दोघे हा मुद्देमाल घेऊन पळाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा फुलसावंगी येथे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. सर्व लुटारूंना अटक करावी आणि व्यापारी तथा सर्वसामान्य नागरिकांना गुंडापासून संरक्षणाची हमी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांची आणि जनतेची आहे. त्यासाठी शुक्रवारपर्यंत पोलिसांना जनतेकडून मुदत देण्यात आली आहे. (वार्ताहर)