टायगर फोर्स प्रोटेक्शनची कारवाई
By Admin | Updated: June 14, 2015 02:48 IST2015-06-14T02:48:31+5:302015-06-14T02:48:31+5:30
पैनगंगा अभयारण्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू असून यावर कुणाचाही अंकुश नव्हता.

टायगर फोर्स प्रोटेक्शनची कारवाई
उमरखेड : पैनगंगा अभयारण्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू असून यावर कुणाचाही अंकुश नव्हता. मात्र शुक्रवारी टायगर प्रोटेक्शन फोर्सने पैनगंगा अभयारण्यात कारवाई करून चौघांना अटक केली. आठ जण मात्र पसार झाले आहे. या कारवाईने वन विभागात तस्करी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात रेती आहे. या सोबतच माती, मुरूमसुद्धा जंगलात आहे. या गौण खनिजाचे अवैध उत्खनन केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून खरबी वनपरिक्षेत्रातून खुलेआम ट्रक-ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात होती. अभयारण्याचे सर्व नियम पायदळी तुडविले जात होते. या सर्व बाबींची माहिती स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सला मिळाली. त्यांनी गुरुवारी रात्री खरबी वनपरिक्षेत्रात धाड मारली. यावेळी चार ट्रॅक्टर चालकांना रंगेहात पकडण्यात आले. इतर चार आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. चौघांना २० जूनपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.
वन्यजीव विभाग नागपूर कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या अभयारण्यातील रेती घाटातून मोठ्या प्रमाणात उत्खनन केली जात आहे. वारंवार सूचना देऊनही रेती तस्कर मोठ्या प्रमाणात उत्खनन करीत आहे. खरबी वनक्षेत्राचे वन अधिकारी एस.बी. पाटील यांनी गुरुवारच्या रात्री पेंधा येथील रेतीघाटावर स्पेशल टायगर फोर्सच्या मदतीने धाड टाकली. त्यावेळी व्यंकटी परशराम चुनुगुलवाड, गंगाधर महादू नल्लेवाड दोघेही रा.किनवट, अनिल मारोती डवले व विजय दिगांबर कामरवार रा.पार्डी ता.किनवट यांना अटक करण्यात आली. आठ आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. वन्यजीव विभाग नागपूरचे मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक आर.एस. बोराडे यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली. (शहर प्रतिनिधी)